
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली आहे. या जागेवर शिवसेनेतर्फे रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ऋतुजा यांनी या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ऋतुजा यांना पाठिंबा देण्यासाठी स्वत: युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे आले होते.

ऋतुजा यांचा अर्ज भरण्यापूर्वी शिवसैनिकांनी आपली ताकद काय आहे हे ऋतुजा यांच्या समर्थनासाठी एका फेरीचं आयोजन केलं होतं. गणेश मंदिर, मालपा डोंगरी येथून या फेरीला सुरुवात झाली होती. ऋतुजा यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रतिक्रिया देताना विभागप्रमुख आणि आमदार अनिल परब यांनी म्हटले की, मविआच्या उमेदवार ऋतुजा लटके विक्रमी मतांनी विजयी होतील याबाबत आमच्या मनात कोणतीही शंका नाही.
ऋतुजा लटके यांच्याप्रमाणेच शिवसेनेच्या संदीप नाईक यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता, ज्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. याबाबत विचारलं असता अनिल परब यांनी सांगितले की, “आयोगाच्या नियमानुसार एबी फॉर्ममध्ये तरतूद असते की पहिला उमेदवाराने काही कारणामुळे अर्ज मागे घेतला किंवा त्यांचा फॉर्म बाद झाला तर शिवसेनेचा दुसरा अधिकृत उमेदवार म्हणून ज्याचे नाव त्या फॉर्ममध्ये लिहिलेलं असतं त्याला अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलं जातं. म्हणून शिवसेनेने संदीप नाईक यांची उमेदवारी भरली आहे. ऋतुजा यांचा अर्ज वैध घोषित होईल फॉर्म ओके होईल तेव्हा तो मागे घेतला जाईल. “




























































