सामना अग्रलेख – अवकाळीचे शुक्लकाष्ठ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकीकडे ‘कोरोना’चे सावट आणि दुसरीकडे अवकाळी- चे संकट. कोरोनाशी युद्धपातळीवर प्रयत्न करून दोन हात करता येतील, पण लहरी निसर्गाला रोखणार कसे हा प्रश्न आहेच. अवकाळीचे शुक्लकाष्ठ महाराष्ट्राच्या मागे काही वर्षांपासूनच लागले आहे. त्याचीच पुनरावृत्ती मंगळवारी गारपिटीसह झाली. राज्यातील सत्ताधारी संवेदनशील आहेत. अस्मानी आणि सुलतानीच्या संकटातून शेतकऱयांना बाहेर काढण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत. अवकाळीच्या तडाख्याने रब्बीही हिरावून घेतलेल्या बळीराजाला उभे करावे लागेल.

राज्यभरात सध्या कोरोनाचे सावट पसरलेले आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यातच राज्याला अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीचा तडाखा पुन्हा बसला आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जळगाव, धुळे, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, वर्धा, वाशिम, हिंगोली, जालना, परभणी, संभाजीनगर या जिल्हय़ांत हा तडाखा बसला आहे. त्यामुळे खरिपाची काढणीला आलेली पिके आणि फळबागा यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही ठिकाणी कापणी करून ठेवलेले पीक भिजल्याने वाया गेले आहे. काही वर्षांपासून महाराष्ट्रात हे असेच सुरू आहे. खरीप आणि रब्बी पीक बळीराजाला सुरक्षित आणि सुरळीतपणे मिळाले असे झालेलेच नाही. गेल्या वर्षी तर अतिवृष्टी आणि महापुराचे तडाखे महाराष्ट्राला बसले. काही ठिकाणी नेमकी खरीप हंगामात पावसाने पाठ फिरवली. त्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव पिकांच्या जिवावर बेतला. आधीच बळीराजा सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाच्या संकटातून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्य सरकारतर्फेही शेतकऱयांना कर्जमुक्त करण्याचे

सर्वतोपरी उपाय

योजले जात आहेत. शेतकऱयांना जाहीर केलेली दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी हा त्याच प्रयत्नांचा भाग आहे. अर्थात, सरकार सगळे प्रयत्न करीत असले तरी अस्मानीची लहर माणसाच्या आटोक्याबाहेरच आहे. ती कधी फिरेल हे सांगता येत नाही. आपल्या देशासाठी तर हा अनुभव खूप जुना आहे. त्यामुळे हवामान खात्याचे अंदाजही अनेकदा ‘अंदाज पंचे’ ठरून चेष्टेचा विषय ठरतात. कधी अवकाळी तर कधी गारपीट, कधी महापूर तर कधी तीक्र दुष्काळ अशी आपल्याकडील हवामानाची लहर फिरत असते. म्हणजे पावसाळय़ात ज्या पावसाने पडायला हवे तो मराठवाडय़ासारख्या प्रदेशावर रुसून बसतो, तेव्हा पडत नाही. मराठवाडय़ातील जनतेला थेंबभर पाण्यासाठी दाही दिशा फिरायला लावतो. त्यातूनही बळीराजाने जिद्दीने पीक काढलेच तर पावसाळय़ात गायब झालेला पर्जन्यराजा आता मार्चमध्ये अवकाळी आणि गारपिटीच्या रूपात तडाखा देऊन हातातोंडाशी आलेली पिके उद्ध्वस्त करतो. विदर्भाचेही चित्र या वर्षी वेगळे नाही. गेल्या वर्षी राज्याच्या मोठय़ा भागातील खरिपाचा हंगाम अतिवृष्टीने नष्ट झाला. आता रब्बीचे पीक चांगले आले तर अवकाळीच्या तडाख्याने ते हिरावून घेतले. गहू, हरभरा, मका, टोमॅटो, कांदा आदी

पिकांचे नुकसान

झाले आहे. शिवाय संत्री, आंबा, केळी, डाळिंब, मोसंबी आदी फळबागांनाही गारपिटीचा तडाखा बसला आहे. भाजीपाल्याचेही नुकसान झाले आहे. खरिपाचे पीक महापुरात बुडाले आणि रब्बीचे पीक अवकाळीने हिरावून घेतले. काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्रात अवेळी पाऊस झाल्याने शेतीचे नुकसान झाले होते. आता अवकाळीबरोबरच वादळी वारे आणि गारपिटीचा तडाखा बसला आहे. शेतात उभे असलेले आणि काढणीला आलेले पीक, फळे एका फटक्यात आडवी झाली आहेत. एकीकडे ‘कोरोना’चे सावट आणि दुसरीकडे अवकाळी-गारपिटीचे संकट. कोरोनाशी युद्धपातळीवर प्रयत्न करून दोन हात करता येतील, पण लहरी निसर्गाला रोखणार कसे हा प्रश्न आहेच. अवकाळीचे शुक्लकाष्ठ महाराष्ट्राच्या मागे काही वर्षांपासूनच लागले आहे. त्याचीच पुनरावृत्ती मंगळवारी गारपिटीसह झाली. हे शुक्लकाष्ठ दूर करणे माणसाच्या हातात नाही. तथापि, त्यामुळे उद्भवणाऱया संकटाशी दोन हात करावेच लागतील. राज्यातील सत्ताधारी संवेदनशील आहेत. अस्मानी आणि सुलतानीच्या संकटातून शेतकऱयांना बाहेर काढण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत. अवकाळीच्या तडाख्याने रब्बीही हिरावून घेतलेल्या बळीराजाला उभे करावे लागेल.