सामना अग्रलेख – शेतकरी वाऱ्यावर; पंतप्रधान दौऱ्यावर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी या जुन्याच मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात नव्या लढाईचा एल्गार पुकारला आहे. त्यांच्यावर पोलिसी लाठ्या, रबरी गोळ्यांचा, मारा होत आहे तर महाराष्ट्रातील बळीराजा गारांचा आणि राज्यकर्त्यांच्या बेपर्वाईचा मारा सहन करीत आहे. दिल्लीत सुलतानी आणि महाराष्ट्रात अस्मानी या चक्रव्यूहात शेतकरी सापडला आहे. या चक्रव्यूहात त्याला तसेच ठेवून पंतप्रधान अबुधाबीत ‘अहलान मोदी’च्या आत्मानंदात मग्न आहेत. ‘शेतकरी वाऱ्यावर, पंतप्रधान दौऱ्यावर’ असे हे संकट आहे. त्यातून शेतकऱ्याची मुक्तता होणार कशी, हा खरा प्रश्न आहे.

पंजाब-हरयाणातील शेतकरी न्याय्य मागण्यांसाठी पुन्हा एकदा दिल्लीतील हुकूमशाही राजवटीला धडका देत आहेत. दिल्लीशहांच्या विरोधात त्यांनी रणशिंग फुंकले आहे. अर्थातच त्यांच्यावर हुकूमशाहीचा वरवंटा फिरवला जात आहे. त्यांचे दिल्लीचे मार्ग रोखण्यासाठी दडपशाहीचे सर्व मार्ग अवलंबले जात आहेत. अश्रुधूर, लाठीमाराचे तडाखे कमी पडले म्हणून की काय, रबरी गोळ्यांचादेखील मारा त्यांच्यावर करण्यात येत आहे. राजधानीच्या सीमेवर शेतकऱयांविरोधात अशी सुलतानी सुरू आहे, तर महाराष्ट्रातील बळीराजावर अवकाळी, गारपिटीचे ‘अस्मानी’ संकट कोसळले आहे. मागील काही वर्षांत अवकाळी, गारपीट आणि चक्रीवादळाचे तडाखे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नेहमीचेच झाले आहेत. कधी अवकाळी पाऊस तर कधी गारपिटीचा तडाखा. त्यात अधूनमधून चक्रीवादळाचाही फटका बसत असतो. त्यामुळे शेतातले पीक हातात येईलच, याचा कोणताच भरवसा शेतकऱ्यांना राहिलेला नाही. ना निसर्गावर भरवसा, ना सरकारच्या आश्वासनांवर. राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि नगर जिल्ह्यांना अवकाळी पाऊस तसेच गारपिटीने तडाखा दिला आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोसळलेल्या या संकटाने शेतकऱ्यांच्या

हातातोंडाशी आलेले

रब्बीचे पीक हिरावून घेतले आहे. सर्वाधिक नुकसान विदर्भातील शेतीचे झाले आहे. नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यांत सलग दुसऱ्या दिवशी गारपीट झाली. पाऊस आणि गारपीट यामुळे सोयाबीन, हरभरा, गहू, तूर, कापूस, ज्वारी, भाजीपाला आणि फळबागा अक्षरशः भुईसपाट झाल्या आहेत. अनेक गारपीटग्रस्त गावे आधीच अनेक वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसत आहेत. या सगळ्या परिस्थितीला कसेबसे तोंड देत बळीराजाने याही वर्षी शेतात पीक उभे केले आणि आता हाताशी आलेले पीक गारपिटीने नष्ट केले. या अवकाळीचा धोका अजून दोन दिवस असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या वर्षी सुरुवातीला पाऊस लांबला. नंतर कमी पडला. त्यामुळे अनेक ठिकाणी खरीप हंगामाची वासलात लागली. नंतर काही जिल्ह्यांत अतिवृष्टीने खरिपाचे पीक वाहून गेले. आता अवकाळी आणि गारपिटीने रब्बीचे पीक उद्ध्वस्त केले. काढणीला आलेला गहू, हरभरा, करडई आपल्या डोळ्य़ांसमोर आडवे झालेले पाहण्याचे शेतकऱ्याच्या नशिबी आले. अनेक ठिकाणी हरभरा मोडून नव्याने पेरला होता. तो काढणीला आला होता. मात्र अवकाळी आणि गारपिटीने तोदेखील आडवा केला. राज्यातील सत्ताधारी नेहमीप्रमाणे

नक्राश्रू ढाळतील

आणि सरकारी मदतीचे मोठे आकडे जाहीर करतील. मात्र शेतकऱ्यांना खरिपातील पीक विम्याचेच पैसे अद्यापि मिळालेले नाहीत. त्यामुळे आता झालेल्या नुकसानीची भरपाई कधी मिळेल, याची खात्री कुठे आहे? पुन्हा केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधारी फक्त विरोधी पक्ष आणि नेत्यांना फोडण्यात मग्न आहेत. आगामी लोकसभा निवडणूक साम, दाम, दंड, भेद या मार्गांनी जिंकायची, त्यासाठी विरोधी पक्षांमध्ये फूट पाडायची एवढेच त्यांचे लक्ष्य आहे. त्यांना ना शेतकऱयांना न मिळालेल्या खरिपाच्या नुकसान भरपाईची जाणीव आहे, ना आता गारपिटीने उद्ध्वस्त झालेल्या रब्बी हंगामाची. शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी या जुन्याच मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱयांनी केंद्र सरकारविरोधात नव्या लढाईचा एल्गार पुकारला आहे. त्यांच्यावर पोलिसी लाठ्या, रबरी गोळ्यांचा, अश्रुधुराचा मारा होत आहे तर महाराष्ट्रातील बळीराजा गारांचा आणि राज्यकर्त्यांच्या बेपर्वाईचा मारा सहन करीत आहे. दिल्लीत सुलतानी आणि महाराष्ट्रात अस्मानी या चक्रव्यूहात शेतकरी सापडला आहे. या चक्रव्यूहात त्याला तसेच ठेवून पंतप्रधान अबुधाबीत ‘अहलान मोदी’च्या आत्मानंदात मग्न आहेत. ‘शेतकरी वाऱ्यावर, पंतप्रधान दौऱ्यावर’ असे हे संकट आहे. त्यातून शेतकऱयाची मुक्तता होणार कशी, हा खरा प्रश्न आहे.