सामना अग्रलेख – मध्य प्रदेशातील ‘उलटी वरात’!

7889

ज्योतिरादित्य शिंदे यांना गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने संपूर्ण ताकद लावून पराभूत केले. त्या ज्योतिरादित्य यांना आज भाजपने वाजतगाजत आपल्या पक्षात प्रवेश दिला. मध्य प्रदेशातील ही उलटी वरातभाजपला बेटकुळ्या फुगवणारी जरूर वाटत असली तरी काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री कमलनाथ हेदेखील कसलेले आणि मुरलेले राजकारणी आहेत. हिकमती आणि करामती आहेत. काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात जे भूतोअसे अनपेक्षित राजकीय नाटय़ घडले तसा एखादा धक्कादायक प्रयोगमध्य प्रदेशातही घडू शकतो. हे मध्य प्रदेशातील उलट्या वराती नाचणाऱ्या भाजपच्या वऱ्हाडीमंडळींनी लक्षात ठेवलेले बरे!

दैव देते आणि कर्म नेते अशी अवस्था काँग्रेस पक्षाची झाली आहे. मध्य प्रदेशात काँग्रेस पक्षातच बंड झाले. विधिमंडळ काँग्रेस पक्षात फूट पडली. काँग्रेसच्या किमान 22 आमदारांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा त्याग केला. शिंदे यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे कमलनाथ यांचे सरकार अल्पमतात आले. मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार कोसळलेच तर त्याचे श्रेय भाजपच्या चाणक्य मंडळाने घेऊ नये. कमलनाथांचे सरकार कोसळताना दिसत आहे ते बेफिकिरी, हलगर्जीपणा, अहंकार आणि नव्या पिढीस कमी लेखण्याच्या प्रवृत्तीमुळे. दिग्विजय सिंग, कमलनाथ हे मध्य प्रदेशातील जुनेजाणते नेते आहेत. कमलनाथही पुरातन आहेत. त्यांची आर्थिक शक्तीही मोठी आहे. म्हणून तर काठावरचे बहुमत असतानाही त्यांनी इकडचे तिकडचे आमदार गोळा करून पाठिंब्याची मोट बांधली होती. हे सत्य असले तरी ज्योतिरादित्य शिंदे यांना मध्य प्रदेशात टाळून राजकारण करता येणार नाही. शिंदे यांचा प्रभाव संपूर्ण राज्यावर नसेलही, पण ग्वाल्हेर, गुना अशा मोठय़ा भागावर आजही शिंदेशाहीचा प्रभाव आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्योतिरादित्य शिंदे हाच काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होता. पण नंतर ज्येष्ठांनी त्यांचा काटा काढला व दिल्लीचे हायकमांड हतबलतेने पाहात राहिले. त्या वेळची मध्य प्रदेशची स्थिती गुंतागुंतीची होती हे नक्की, पण लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांना ‘अडगळीत’ टाकणे काँग्रेस पक्षाला सोयीचे नव्हते. या असंतोषातूनच गेल्या दोनेक महिन्यांपासून ठिणग्या उडत होत्या. त्याची दखल घेतली जात नव्हती व काठावर बहुमत असलेले सरकार आपण रेटून नेऊ या भ्रमात काँग्रेसचे ज्येष्ठ नागरिक मंडळ राहिले. ज्योतिरादित्य शिंदे हे फार काही मागत नव्हते. सुरुवातीला ते प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद मागत होते. नंतर त्यांनी राज्यसभेची उमेदवारी मागितली अशा उडत्या चर्चा आहेत. यापैकी एखादी मागणी मान्य केली असती तर तेलही गेले आणि तूपदेखील गेले अशी वेळ काँग्रेसवर आली नसती. ज्योतिरादित्य यांच्यासारखा नेता

पक्ष सोडून भाजपमध्ये

गेला नसता. वास्तविक, केवळ आठ महिन्यांपूर्वी याच ज्योतिरादित्य यांनी भाजपवर ‘लोकशाहीचा गळा घोटणारा पक्ष’ या शब्दांत जळजळीत टीका केली होती. कर्नाटकमधील काँग्रेस-जेडी (एस) संयुक्त सरकार भाजपने घोडेबाजार करून पाडल्यानंतर शिंदे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली होती. दिल्लीतील हिंसाचारावरूनही शिंदे यांनी 15 दिवसांपूर्वीच भाजप नेत्यांवर ‘द्वेषाचे राजकारण’ पसरविल्याचा आरोप केला होता. मात्र तेच ज्योतिरादित्य ‘काँग्रेस पक्ष आता पूर्वीसारखा राहिलेला नाही’ असे म्हणत भाजपवासी झाले आहेत. खरे म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत संघर्ष करून राजस्थान, मध्य प्रदेशसारखी मोठी राज्ये काँग्रेसने जिंकली होती. त्याचे श्रेय तेव्हा राहुल गांधींना मिळाले होते. ही दोन्ही राज्ये भाजपकडून खेचणे सोपे नव्हते. दोन्ही राज्यांत भाजपचे तत्कालीन दिग्गज नेतृत्व सरकार चालवीत होते. काँग्रेसचे संघटन तेथे खिळखिळे झाले होते. मोदी यांचा प्रभावदेखील होताच. अशा परिस्थितीत तरुणाई, शेतकरी, कष्टकरी यांनी काँग्रेसला मतदान केले होते. दोन्ही राज्यांत भाजपचा निसटता पराभव झाला होता व काँग्रेसची सरकारे ‘काठावर’ बनवली गेली. त्यामुळेच स्वतःला ज्येष्ठ वगैरे समजणाऱ्या पुरातन मंडळींच्या हाती मुख्यमंत्रीपदाची सूत्रे गेली. पुढच्या लोकसभा निवडणुकीत या दोन्ही राज्यांत काँग्रेसचा पराभव झाला. संपूर्ण राजस्थानातून काँग्रेसला एकही लोकसभेची जागा जिंकता आली नाही. मुख्यमंत्री गेहलोत यांचे चिरंजीव जोधपूर मथुरा मतदारसंघातून दारुणरीत्या पराभूत झाले. स्वतः श्री. गेहलोत हे जोधपूरला ठाण मांडून बसले होते तर मध्य प्रदेशात कमलनाथांचे चिरंजीव कसेबसे निवडून आले. जुनेजाणते असे अपयशी ठरतात तेव्हा नव्यांना संधी देऊन त्यांचे नेतृत्व पुढे आणणे गरजेचे ठरते. मात्र तसे घडले नाही. त्यामुळे राजस्थानातही तरुण तडफदार सचिन पायलट व मुख्यमंत्री गेहलोत यांच्यात संघर्ष सुरू आहे. तो मिटला नाही तर

राजस्थानही मध्य प्रदेशच्याच मार्गाने

जाईल असे छातीठोकपणे सांगितले जात आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आधी आसाम, हरयाणातही वाद झाले. आसामातील काही मजबूत जनाधार असलेले नेते दिल्ली दरबारी चकरा मारून थकले व शेवटी भाजपवासी झाले. त्यांच्यामुळेच आसामात भाजपचे राज्य आले. काँग्रेस नेतृत्व जुन्यांच्या कोंडाळ्यात अडकले आहे. त्यामुळे नव्यांची घुसमट होत आहे हे मध्य प्रदेशातील घडामोडीने स्पष्ट झाले. सोनिया गांधी या जुन्या नेत्यांचे प्रतिनिधित्व करत असतीलही, पण प्रियांका गांधी, राहुल गांधी यांनी नवतरुणांच्या मनांची स्पंदने समजून घेतली पाहिजेत. मध्य प्रदेशात पुढे आणखी काय घडते ते लवकरच समजेल, पण तेथील घडामोडींनी महाराष्ट्रातील भाजपवाल्यांनी उड्या मारू नयेत. मध्य प्रदेशचे राजकारण त्याच्या जागी, महाराष्ट्रामधील कमळ पंथीयांनी चालता बोलता स्वप्ने पाहू नयेत. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चालले आहे. ते मजबूत व अभेद्य आहे. एखाद्या फितूर मुंगीलाही आत-बाहेर करता येईल इतकीही फट त्यात नाही. तेव्हा स्वप्न बघणे सोडा इतकाच सल्ला आम्ही त्यांना देत आहोत. ज्योतिरादित्य शिंदे यांना गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने संपूर्ण ताकद लावून पराभूत केले. पक्षाचे रथीमहारथी त्यासाठी तेथे ठाण मांडून बसले होते. त्या ज्योतिरादित्य शिंदे यांना आज भाजपने वाजतगाजत आपल्या पक्षात प्रवेश दिला. त्यांच्या नेतृत्व गुणांवर स्तुतिसुमने उधळली. म्हणजे गेल्या वर्षी भाजपने त्यांच्या ‘पराभवाची मिरवणूक’ काढली. आज त्यांना मानसन्मानाने पक्षात घेतले. मध्य प्रदेशातील ही ‘उलटी वरात’ भाजपला बेटकुळ्या फुगवणारी जरूर वाटत असली तरी काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री कमलनाथ हेदेखील कसलेले आणि मुरलेले राजकारणी आहेत. हिकमती आणि करामती आहेत. ते सहजासहजी हार मानणारे नाहीत. काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात जे ‘न भूतो’ असे अनपेक्षित राजकीय नाटय़ घडले तसा एखादा धक्कादायक ‘प्रयोग’ मध्य प्रदेशातही घडू शकतो. हे मध्य प्रदेशातील ‘उलट्या वराती’त नाचणाऱ्या भाजपच्या ‘वऱ्हाडी’ मंडळींनी लक्षात ठेवलेले बरे!

आपली प्रतिक्रिया द्या