
मोदींच्या काळात अयोध्येत राममंदिराचे निर्माण झाले हे खरे, पण भारत वर्षावर सत्यवचनी रामाचे राज्य ते आणू शकले नाहीत. त्यांनी आणले अदानींचे राज्य. हीच मोदींच्या 12 वर्षांच्या राज्यकारभाराची फलश्रुती आहे. काळा पैसा परदेशातून परत आलाच नाही. उलट तो वाढत गेला व पुन्हा परदेशात पोहोचला. त्या पैशांचा हिशोब पाहण्यासाठीच मोदी परदेशवाऱ्या करतात काय, अशी शंका त्यामुळे येते. पंडित नेहरूंनी स्वातंत्र्य चळवळीसाठी स्वतःची सर्व वैयक्तिक संपत्ती, बंगला वगैरे दान केले. (तेव्हाच्या संपत्तीचे मूल्य साधारण 200 कोटी रुपये होते, म्हणजे आजचे 12,000 कोटी रुपये.) हा त्याग आहे. मोदींच्या कार्याकडे पाहिल्यावर नेहरूंच्या त्यागाचे तेज उजळून निघते. 26 तारखेला मोदींना येऊन 12 वर्षे झाली. 27 तारखेला नेहरूंना जाऊन 62 वर्षे झाली. तरीही नेहरू अमर आहेत!
योगायोग कसा असतो पहा. पंतप्रधान मोदी यांना सत्तेवर येऊन 26 मे रोजी 12 वर्षे पूर्ण झाली. त्याबद्दल भारतीय जनता पक्षाने उत्सव साजरा करणे, मोदींवर स्तुतीसुमने उधळणे यात आश्चर्य वाटावे असे काहीच नाही. प्रत्येक गोष्टीचा उत्सव, पराभव व पीछेहाटीचा उत्सव हेच मागच्या 12 वर्षांच्या कालखंडाचे राज्यसूत्र आहे. माघार घेतलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चाही उत्सव झाला. पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील 40 जवानांच्या हौतात्म्याचाही उत्सव केला गेला. 26 मे 2014 रोजी भारतात सत्तापरिवर्तन झाले. या दिवसाला प्रत्येक वर्षी ‘सेवा सुशासन स्थापना दिवस’ म्हणून मानावे असे भाजपच्या मंडळींचे म्हणणे आहे. योगायोग असा की, 26 मे हा मोदींचा ‘उत्सव दिवस’ आणि लगेच दुसऱ्या दिवशी पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीचा दिवस. नेहरूंना जाऊन 62 वर्षे झाली, पण स्वातंत्र्यानंतर जन्मलेली व 2014 नंतरही ज्यांचा मेंदू आणि आत्मा जिवंत राहिला, अशा लाखो लोकांनी नेहरूंचे स्मरण केले. स्वतंत्र भारताच्या उभारणीतील नेहरूंच्या योगदानावर लेख लिहिले, चर्चा केली. याचाच अर्थ मोदी व त्यांच्या लोकांनी मागील दहा-बारा वर्षांत रोज नेहरूंची बदनामी करूनही आणि नेहरूंच्या राष्ट्रकार्यावर प्रश्न उपस्थित करूनही जनतेच्या मनात नेहरू अढळ आहेत. मोदी यांनी नेहरूंच्या पुण्यतिथीस लोकलज्जेस्तव एका ओळीची श्रद्धांजली वाहिली. खरे तर भारत भाग्यविधाता असलेल्या नेहरूंच्या समाधीस्थळी जाऊन त्यांनी स्वतःला पंतप्रधानपदी 12 वर्षे झाल्याबद्दल आशीर्वाद आणि प्रेरणा घ्यायला हवी होती, पण त्यासाठी मन मोठे असावे लागते. 12 वर्षांतील मोदींची भरीव कामगिरी कोणती? निवडणूक आयोगास खिशात टाकून प्रत्येक निवडणूक जिंकणे हीच जर कोणी मोदींची भरीव कामगिरी मानत असेल तर प्रभू श्रीराम अशा लोकांना सुबुद्धी देवो. मोदी यांचा थाटमाट वेगळा आहे. मोदी सरकारने मागच्या 12 वर्षांत स्वतःच्या प्रसिद्धीवर 5,987.46 कोटी रुपये खर्च केले. म्हणजे रोज साधारण दीड ते पावणेदोन कोटी. नेहरूंना अशा खोटय़ा प्रसिद्धीची गरज भासली नाही. त्यांचे नेतृत्व स्वातंत्र्य चळवळीतून तावून सुलाखून निघाले होते. ते स्वतःच एक तेजोवलय होते. मोदी यांच्या सुरक्षेवर सालाना 600 कोटी रुपये खर्च होतो. हे अधिकृत आकडे आहेत. म्हणजे रोज किती कोटी, ते लोकांनी मोजत बसावे. 2014 पासून 2026 पर्यंत मोदींच्या परदेश दौऱ्यांवर सुमारे 16,815 कोटी रुपये खर्च झाल्याची नोंद आहे. मोदी यांनी दौऱ्यासाठी 10 हजार कोटींचे भव्य अलिशान विमान खरेदी केले आहे. मोदी यांच्या
श्रीमंती कपड्यांवर चर्चा
होते. त्यांचा सूट दहा लाखांचा, पेन दोन लाखांचे, घडय़ाळ पाच लाखांचे, गॉगल दोन-पाच लाखांचा, चपला तीन लाखांच्या अशी रंजक माहिती चर्चेत येत असते, पण मोदींना अशा छान-छौकीची आवड असावी. गरिबी भोगलेला, चहा विकून झेप घेतलेला कोणताही नेता स्वतःवर इतका प्रचंड खर्च जनतेच्या तिजोरीतून होऊ देणार नाही. तो काटकसरीने व साधेपणानेच जगेल, पण पंतप्रधान मोदी तसे नाहीत. याउलट पंडित नेहरूंचे जॅकेट, शेरवानी, टोपी आणि गुलाब हे फक्त कपडे नव्हते, तर स्वतंत्र भारताचे सौंदर्यशास्त्र होते. नेहरूंच्या ‘ड्रेस स्टाईल’ने भारताला एक सभ्य, सुसंस्कृत, आत्मविश्वासू राष्ट्र म्हणून ओळख दिली. नेहरू हे अनेक दृष्टीने अद्भुत होते. अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांना श्रीरामाची उपमा दिली होती. कॉ. हिरेन मुखर्जी म्हणाले होते की, ‘‘नेहरू हे यशस्वी राजकारणी होऊ शकले नाहीत. कारण सध्याच्या राजकारणात यशस्वी होण्यासाठी जी असभ्यता, खोटारडेपणा लागतो, तो नेहरूंकडे अजिबात नव्हता.’’ म्हणजेच ते रामाप्रमाणे सत्यवचनी होते हे वाजपेयींचे म्हणणे खरे ठरते. रामाच्या नावाने राज्य करणाऱ्या मोदी यांनी देश घडवण्यासाठी कोणते टक्के-टोणपे खाल्ले? उलट त्यांच्या राजवटीमुळे जगाच्या नकाशावर आज भारताच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मोठय़ा जागतिक निर्णयांपासून भारताला लांब ठेवले जात आहे. भारत एक भ्रष्ट, मोजक्या लोकांच्या विलासी गरजा पुरवणारा देश म्हणून ओळखला जात आहे. लोकशाहीच्या नावाखाली सुरू असलेली हुकूमशाही, धुडगूस हीच पंतप्रधान मोदींची 12 वर्षांत भारताला मिळालेली देण आहे. भारताची अर्थव्यवस्था कोसळली आहे. भारतात लवकरच आर्थिक मंदीचे तुफान येईल, असे राहुल गांधींनी म्हटले ती परिस्थिती येणारच आहे. रुपया साफ कोसळला आहे. महागाई शिखरावर गेली आहे आणि मोदी त्यांच्या ‘एक्स’ माध्यमावरून भारतात गर्मी वाढत असल्याने लोकांनी सावधगिरी बाळगावी, पाणी पित राहावे. अशा सूचना देत आहेत. मुळात देशातील 60 टक्के जनतेला आजही शुद्ध पेयजल मिळत नाही. ‘जलजीवन मिशन’ हा एक ‘फ्रॉड’ बनला आहे. नेहरू पंतप्रधान झाले तेव्हा भारत भूक, गरिबी, बेरोजगारी आणि फक्त 500 कोटींच्या ‘बजेट’शी झुंजत होता. तरीही नेहरूंनी आयआयटी, एम्स, इस्रो, अॅटॉमिक रिसर्च सेंटरसारख्या संस्थांचे निर्माण केले. मोदींना सत्तेत 12 वर्षे होत असताना भारताचे बजेट 53.47 लाख कोटींचे आहे. एवढे मोठे बजेट असूनही मोदी राजवटीत नेहरूंसारखी कोणती संस्थात्मक उभारणी झाली? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच येते. महाराष्ट्रात मिंध्यांसारखे लोक सांगतात, ‘‘12 वर्षांत मोदींवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही.’’ खरे म्हणजे असे विधान करणाऱ्या सर्व मिंध्यांना सत्तेत सहभागी करून घेणे, त्यासाठी निवडणूक आयोग व सुप्रीम कोर्टाला वेठीस धरणे आणि
सत्ता स्थापनेसाठी
विरोधी आमदारांना पन्नास-पन्नास कोटींना विकत घेणे हाच भारतातला आतापर्यंतचा सर्वोच्च भ्रष्टाचार आहे. सुवेंदू अधिकारी, हेमंत बिस्वा सर्मा, एकनाथ शिंदे हीच मोदींच्या भ्रष्टाचाराची प्रतीके आहेत. मोदी यांचे गुणगाण त्यांची भक्तमंडळी, त्यांनी नेमलेले मुख्यमंत्री करत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘मी तर मोदींच्या कार्यावर दिवस-दिवस बोलू शकतो.’’ मग 12 वर्षे वेगळे काय चालले आहे? मोदी व त्यांच्या सरकारने 12 वर्षांत किमान बाराशे थापा मारल्या आहेत. प्रत्येक भारतीय नागरिकाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकू इथून सुरू झालेला थापांचा प्रवास अद्यापि संपलेला नाही. या प्रवासात लोकशाही व संविधानाचे पूर्णपणे पतन झाले. मोदी यांनी दिल्लीतील राजपथाचे नामकरण कर्तव्यपथ केले. राजभवनाचे लोकभवन, पंतप्रधान कार्यालयाचे सेवातीर्थ केले. पंतप्रधानांना राहण्यासाठी स्वतंत्र भव्य निवासस्थान ते उभारत आहेत. सध्या मोदींचे निवासस्थान आठ एकरांत आहे. आता बाजूच्या दिल्ली जिमखान्याचा 27 एकरांचा भूखंड मोदींना त्यांच्या निवासस्थानासाठी हवा आहे. नेहरू, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री, नरसिंह राव, डॉ. मनमोहन सिंग यांनी असा ‘थाट’ कधी दाखवला नाही, पण ‘प्रधानसेवक’ म्हणवून घेणाऱ्यांचा हा थाट म्हणजे देशसेवा मानावी लागते. पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाशी शेवटपर्यंत लढू हे मोदींचे वचन होते. पाकच्या ताब्यातील कश्मीर ते भारतास जोडणार होते, पण ‘ऑपरेशन सिंदूर’ त्यांनी मागे घेतले. पुलवामात सैनिकांचे व पहलगाममध्ये हिंदू पर्यटकांचे रक्त सांडले. 370 कलम काढूनही कश्मीरला स्थैर्य लाभले नाही. मणिपूर जळत आहे, पण मोदी तेथे गेले नाहीत. याउलट नेहरू दंगलखोरांना आवरण्यासाठी स्वतः दंगलीत घुसल्याच्या घटना रोमांचक आहेत. मोदींच्या काळात अयोध्येत राममंदिराचे निर्माण झाले हे खरे, पण भारत वर्षावर सत्यवचनी रामाचे राज्य ते आणू शकले नाहीत. त्यांनी आणले अदानींचे राज्य. हीच मोदींच्या 12 वर्षांच्या राज्यकारभाराची फलश्रुती आहे. काळा पैसा परदेशातून परत आलाच नाही. उलट तो वाढत गेला व पुन्हा परदेशात पोहोचला. त्या पैशांचा हिशोब पाहण्यासाठीच मोदी परदेशवाऱ्या करतात काय, अशी शंका त्यामुळे येते. पंडित नेहरूंनी स्वातंत्र्य चळवळीसाठी स्वतःची सर्व वैयक्तिक संपत्ती, बंगला वगैरे दान केले. (तेव्हाच्या संपत्तीचे मूल्य साधारण 200 कोटी रुपये होते, म्हणजे आजचे 12,000 कोटी रुपये.) हा त्याग आहे. मोदींच्या कार्याकडे पाहिल्यावर नेहरूंच्या त्यागाचे तेज उजळून निघते. 26 तारखेला मोदींना येऊन 12 वर्षे झाली. 27 तारखेला नेहरूंना जाऊन 62 वर्षे झाली. तरीही नेहरू अमर आहेत!




























































