सामना अग्रलेख – लोकसंख्येचे उड्डाण!

2010 साली जगाची लोकसंख्या 700 कोटी इतकी होती, पण अवघ्या 12 वर्षांत जागतिक लोकसंख्येचा पाळणा अंमळ वेगानेच हलला आणि जगाच्या लोकसंख्येने थेट 800 कोटींवर उड्डाण घेतले. वाढलेल्या 100 कोटींपैकी 53 टक्के लोकसंख्या केवळ 10 देशांनीच वाढवली. यापैकी सर्वाधिक 17.6 टक्के वाढ हिंदुस्थानात झाली. हिंदुस्थानात दर मिनिटाला 55 हून अधिक बालकांचा जन्म होतो. जगाने 800 कोटी लोकसंख्येचा टप्पा ओलांडला असताना त्यात हिंदुस्थानचे योगदान सर्वाधिक असावे हे कितपत भूषणावह आहे? वाढीव लोकसंख्येचे संकट अनेक प्रश्नांना जन्म देते. पाळण्याच्या दोरीला लगाम घालून लोकसंख्यावाढीचे हे संकट जेवढे लांबविता येईल तेवढे लांबवायला हवे!

जगभरात सध्या आर्थिक मंदीचे वारे वाहत आहेत. युरोपसह औद्योगिकदृष्टय़ा प्रगत असलेल्या युरोपीय राष्ट्रांसह आफ्रिका व आशियाई देशांनाही मंदीचे चटके बसत आहेत. जगभरातील अनेक नामांकित कंपन्यांनी नोकरकपात करण्याचा सपाटा चालविला आहे. सर्वत्र असे मंदीचे वारे वाहत असतानाच जगभरातील लोकसंख्यावाढीच्या वेगाने मात्र चांगलीच तेजी पकडली आहे. मंगळवारी समस्त पृथ्वीतलावरील मानवी लोकसंख्येने 800 कोटी अर्थात 8 अब्जचा आकडा पार केला. जगभरातील देशांच्या लोकसंख्येची नोंद घेणाऱ्या संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीनेच (यूएनएफपीए) ही अधिकृत आकडेवारी जाहीर केली. आज चीनची लोकसंख्या 142.6 कोटी तर हिंदुस्थानची लोकसंख्या 141.2 कोटी इतकी आहे. आता जी आकडेवारी जाहीर झाली आहे त्यानुसार येत्या वर्षभरात लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकून हिंदुस्थान पहिल्या क्रमांकावर येण्याची शक्यता आहे. 2050 सालापर्यंत हिंदुस्थानची लोकसंख्या 166.8 कोटी अशी वाढेल, तर चीनच्या लोकसंख्येचा आलेख कमी होऊन तो 131.7 कोटी इतका होईल. 15 नोव्हेंबर रोजी 800 कोटीव्या बाळाचा जन्म होताच संयुक्त राष्ट्रसंघाने खास ट्विट केले. ‘800 कोटी आशा, 800 कोटी स्वप्ने, 800 कोटी शक्यता. आपली पृथ्वी आता

800 कोटी नागरिकांचे घर

बनली आहे’, अशा शब्दांत जागतिक लोकसंख्येच्या नव्या उच्चांकाची घोषणा संयुक्त राष्ट्रांनी केली. जगभरातील देशांची मातृसंस्था म्हणून 800 कोटीव्या क्रमांकाच्या बाळाच्या जन्माने झालेला आनंद समजण्यासारखा असला तरी बेसुमार वाढणाऱ्या लोकसंख्येची चिंता कोणी वाहायची? 800 कोटी स्वप्ने, 800 कोटी आशा हे स्वप्नाळू दुनियेतील स्वप्नरंजन म्हणून वाचायला ठीक असले तरी या 800 कोटी लोकसंख्येतील किती कोटी लोकांच्या आशा, आकांक्षा पूर्ण होतात? किती कोटी लोकांची स्वप्ने पूर्ण होतात? कुटुंबातील सदस्यांच्या संख्येमुळे जसे कुटुंबाचे बजेट कोलमडते तसेच वारेमाप लोकसंख्येमुळे त्या-त्या देशांच्या अर्थकारणावरही बोजा पडत असतोच. कुटुंबाच्या एकूण उत्पन्नाचे जेव्हा अनेक सदस्यांमध्ये विभाजन होते तेव्हा अशा कुटुंबाच्या प्राथमिक व मूलभूत गरजा भागविणेही कठीण होऊन बसते. कुटुंबप्रमुखाची गरजा पुरविताना जी दमछाक होते, तीच अवस्था लोकसंख्येचा विस्फोट झेलणाऱ्या हिंदुस्थानसारख्या अनेक देशांची होते. वाढत्या लोकसंख्येबरोबर अन्न, वस्त्र्ा, निवारा या मूलभूत गरजांसोबतच अन्य सोयीसुविधांचा ताण देशाच्या प्रशासनावर येतोच. शिवाय रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात सरकारे कमी पडतात. लोकसंख्येबरोबरच

बेरोजगारीचा विस्फोट

होतो. एका अर्थाने जनसंख्येतील अफाट वाढ ही जशी गोरगरीब कुटुंबांमध्ये अवदसा बनून येते व त्या कुटुंबाला दारिद्रय़ात ढकलते, तशीच ती देशाच्या सर्वांगीण प्रगतीलाही मारक ठरते. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणीसांनी जे मत व्यक्त केले, ते महत्त्वाचे आहे. ते म्हणतात, ‘‘जोपर्यंत ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ या वर्गांमधील विषमता आणि दरी कमी होत नाही तोपर्यंत आपले 800 कोटी लोकसंख्या बनलेले हे जग तणाव, अविश्वास, संकटे आणि संघर्षाने भरलेले राहील.’’ संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांनी दिलेला हा इशारा योग्यच आहे. 2010 साली जगाची लोकसंख्या 700 कोटी इतकी होती, पण अवघ्या 12 वर्षांत जागतिक लोकसंख्येचा पाळणा अंमळ वेगानेच हलला आणि जगाच्या लोकसंख्येने थेट 800 कोटींवर उड्डाण घेतले. वाढलेल्या 100 कोटींपैकी 53 टक्के लोकसंख्या केवळ 10 देशांनीच वाढवली. यापैकी सर्वाधिक 17.6 टक्के वाढ हिंदुस्थानात झाली. हिंदुस्थानात दर मिनिटाला 55 हून अधिक बालकांचा जन्म होतो. जगाने 800 कोटी लोकसंख्येचा टप्पा ओलांडला असताना त्यात हिंदुस्थानचे योगदान सर्वाधिक असावे हे कितपत भूषणावह आहे? वाढीव लोकसंख्येचे संकट अनेक प्रश्नांना जन्म देते. पाळण्याच्या दोरीला लगाम घालून लोकसंख्यावाढीचे हे संकट जेवढे लांबविता येईल तेवढे लांबवायला हवे!