
चारचाकी वाहनाच्या कर्जापोटी नजरचुकीने दोन हप्ते भरले. यातील एका हप्त्याची रक्कम परत मागण्यासाठी गेलेल्या एका ग्राहकाने दोघा मित्रांच्या मदतीने मण्णपुरम फायनान्स कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केल्याचा प्रकार घडला. तोडफोडीनंतर भयभीत झालेल्या कर्मचाऱयांनी शाहूपुरी पोलिसांत धाव घेतली. केवळ 700 रुपयांसाठी ही तोडफोड करण्यात आली असून, तोडफोडीनंतर त्या ग्राहकांच्या खात्यावर कंपनीकडून पैसे जमा झाल्याचे सांगण्यात येत होते.
पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वर्दळीने गजबजलेल्या दाभोळकर कॉर्नर परिसरातील अयोध्या टॉवरमध्ये दुसऱया मजल्यावर मण्णपुरम फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. कदमवाडी परिसरातील प्रदीप गरड या ग्राहकाने चारचाकी वाहनासाठी कर्ज घेतले होते. दर महिन्याच्या पाच तारखेला कर्जाचा हप्ता वसूल केला जातो.
गरड याने हप्ता भरला नसल्याने कंपनीतील रुपेश पाटील यांनी फोन केला. यानंतर प्रदीप गरड यांनी हप्त्याची रक्कम ऑनलाईन भरली. मात्र, नजरचुकीने दोन हप्ते भरले गेले. त्यामुळे गरड याने कंपनीच्या कार्यालयात जाऊन दुसऱयांदा भरलेली रक्कम परत देण्याची मागणी केली. मात्र, ऑनलाइन भरलेले पैसे दहा दिवसांत परत दिले जातील, असे त्यांना सांगण्यात आले. यामुळे संतप्त झालेल्या गरड याने आपल्या दोन मित्रांसह क्रिकेटच्या बॅटने कार्यालयात घुसून तोडफोड केली. यामध्ये टेबल, खुर्च्या, फॅन आणि काचांचे मोठे नुकसान झाले. अचानक सुरू झालेल्या तोडफोडीने कार्यालयातील कर्मचाऱयांची तारांबळ उडाली. शाहूपुरी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची कारवाई सुरू होती.



























































