बाप्पाच्या विसर्जनासाठी समुद्रात ‘सेफ्टी सिग्नल’! २१ ठिकाणी बसवणार ओहोटी रेषा दर्शवणारी तरंगती चिन्हे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बाप्पाच्या समुद्रातील विसर्जन स्थळांवर आता ओहोटी रेषा दाखवणारे सिग्नल बसवण्यात येणार आहेत. यामध्ये मुंबईतील २१ विसर्जन स्थळांवर ही मार्गदर्शक तरंगती चिन्हे बसवण्यात येणार आहेत. यामध्ये मूरिग यंत्रणा आणि सोलर दिवेही बसवण्यात येतील. याबाबतचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.

मुंबईत लाखो गणेशमूर्ती, गौरी आणि देवींचे समुद्रात विसर्जन करण्यात येते. यावेळी होणारी भाविकांची प्रचंड गर्दी आणि समुद्राच्या लाटांमुळे काही वेळा दुर्घटनाही घडतात. हे प्रकार टाळण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून ओहोटी रेषा दर्शवणारी चिन्हे बसवण्यात येणार आहेत. मुंबईत गणेश उत्सव, नवरात्रोत्सव आणि माघी गणेशोत्सवाच्या मुंबई उच्च न्यायालयाने सन २०२४ मध्ये दिलेल्या निर्देशानुसार मुंबई महानगरपालिकेने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मूर्ती विसर्जनासाठीच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, मूर्ती विसर्जन समुद्रातील ओहोटीची रेषा आणि भरतीची रेषा यांच्यामधील नॉन-इको सेन्सिटिव्ह क्षेत्रातच करण्याची कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे.

अशी राहणार सुविधा
तरंगत्या मार्गदर्शक चिन्हामुळे समुद्रात धोकादायकरीत्या खोलपर्यंत जाण्याला मज्जाव केला जाणार आहे. भाविकांसह कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यानाही या मार्गदर्शक चिन्हांचा फायदा होणार आहे. गिरगाव चौपाटीवर प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम यशस्वी झाला आहे.

रात्रीच्या वेळी ही मार्गदर्शक तरंगचिन्हे स्पष्टपणे दिसण्यासाठी त्यावर सौर दिवा बसविण्यात येईल आणि ही तरंगचिन्हे समुद्रातील लाटांमुळे वाहून जाऊ नयेत म्हणून त्यांना समुद्राच्या तळाशी दोरीने स्थिर बांधून ठेवण्यात येईल.

२ कोटी २२ लाख रुपयांचा खर्च
मुंबईत ४३ ठिकाणी समुद्रात मूर्ती विसर्जन होते. या ४३ ठिकाणांपैकी संवेदनशील २१ ठिकाणी समुद्रातील मार्गदर्शक तरंगचिन्हे (मरीन नेव्हिगेशन बॉयज) बसवण्यात येतील. यासाठी लिटमस मरीन इन्नोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली असून तीन वर्षांच्या देखभालीसह ही यंत्रणा बसवण्यासाठी २ कोटी २२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.