
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाचा धोका जास्त असल्याने गरोदर महिला आणि वृद्धांना साईबाबांच्या समाधी मंदिरात प्रवेश देण्यात येत नव्हता. मात्र, सध्या कोरोनाचा धोका कमी झाल्याने लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या गरोदर महिलांसह वृद्धांना साईमंदिरात प्रवेश देण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणायत यांनी दिली.
बाणायत म्हणाल्या, कोरोना संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाच्या वतीने 5 एप्रिल 2021 पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने 7 ऑक्टोबर 2021 पासून काही अटी-शर्तींवर धार्मिकस्थळे खुली करण्याचे आदेश दिलेले होते. यामध्ये भाविकांनी दर्शनाकरिता जाताना मास्कचा वापर करावा व सामाजिक अंतराचे पालन करावे. तसेच 10 वर्षांखालील मुलांना, गरोदर स्त्रिया, 65 वर्षांवरील व्यक्ती व आजारी व्यक्तींना प्रतिबंधात्मक निर्बंध होते. मात्र, राज्यशासनाने 10 नोव्हेंबरच्या अध्यादेशानुसार कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण झालेल्या गरोदर स्त्रिया व 65 वर्षांच्या पुढील व्यक्तींना धार्मिकस्थळे, प्रार्थनास्थळे यामध्ये प्रवेश देण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार संस्थानच्या वतीने 13 नोव्हेंबरपासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
गरोदर स्त्रिया व 65 वर्षांच्या पुढील व्यक्तींनी श्रींच्या दर्शनाकरिता येताना कोरोना लसींच्या दोन्ही मात्रा घेतल्या असल्याबाबतचे प्रमाणपत्र व आपले आधारकार्ड सोबत बाळगावे, असे आवाहन बाणायत यांनी केले आहे.


























































