सायना नेहवालने केले पोलिसांचे अभिनंदन, ज्वाला गुट्टाने उभे केले प्रश्न

1153

हैदराबाद येथे वेटेरनरी डॉक्टरवर बलात्कार करून तिला जिवंत जाळणाऱ्या चार नराधमांचा आज पोलिसांच्या एनकाऊंटरमध्ये खात्मा करण्यात आला. देशभरातील जनतेने पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले आहे. प्रसिद्ध बॅटमिंटनपटू सायना नेहवालने देखील ट्विट करत पोलिसांच्या या कार्याला सलाम ठोकला आहे. मात्र बॅटमिंटन पटू ज्वाला गुट्टाने या परिस्थितीवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहेत.

28 नोव्हेंबरला या चार नराधमांनी या बलात्कार प्रकरणाचा कट रचला होता. पशुवैद्यकीय महिला डॉक्टरची स्कुटी त्यांनी पंक्चर केली होती. त्यानंतर मदतीच्या बहाण्याने या नराधमांनी तिला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अनन्वित अत्याचार केले. पुरावा नष्ट करण्यासाठी तिची हत्या केली आणि मृतदेह जाळून टाकला. घटना समोर येताच काही तासातच पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली होती. त्यानंतर गुरुवारी रात्री त्या चारही आरोपींना पोलिसांनी घटनास्थळी घटनेचे नाट्यरुपांतरण करण्यासाठी नेले होते. यावेळी आरोपींनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना शरण येण्याचे आवाहन केलं होतं. मात्र तरीही आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे पोलिसांना अखेर शस्त्र उचलावे लागले. पोलिसांच्या कारवाईत चारही नराधमांचा खात्मा झाला. पोलिसांच्या या कारवाईचे देशभरातून कौतुक होत असून पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी देखील आज तिच्या आत्म्याला शांती मिळाली असेल अशी प्रतिक्रीया दिली आहे.

या एनकाऊंटरनंतर प्रसिद्ध बॅटमिंटनपटू सायना नेहवालने देखील पोलिसांच्या कारवाईबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. ‘ग्रेट वर्क हैदराबाद पोलीस.आम्ही तुम्हाला सलाम करतो’ असे ट्विट तिने केले आहे. दरम्यान ज्वाला गुट्टाने या कारवाईनंतर अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत का? असा सवाल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या