साखरपा-बावनदी येथील प्रवासी शेडचा अनेक वर्षे सांगाडाच उभा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निवारा शेड आहे परंतु तिचा उपयोग नाही. केवळ शोभेचे बाहुलेच म्हणावे लागेल. अशीच शेड देवरुख साखरपा मार्गावरील बावनदी-साखरपा रोडवर आहे. परंतु या शेडचा प्रवाशांचा काहीच उपयोग होत नसल्याने केवळ सांगाडा उभा आहे. शेडवरील पत्रे उडाले आहेत की चोरीला गेले आहेत? याची शंकाच आहे. अनेक वर्षे या शेडची ही अवस्था आहे तरी ना लोकप्रतिनिधी ना प्रशासनाला त्याच सोयरसुतक आहे. प्रवाशांच्या सुरक्षेकडे दूर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

देवरुख बस स्थानकामधून साखरपा, मलकापूर, कोल्हापूर, सांगली, अक्कलकोट अशी मोठ्या प्रमाणावर येथून वाहतूक आहे. अनेक बसेस जात या मार्गावरून मार्गस्थ होतात. परंतु या ठिकाणी असलेली निवारा शेड केवळ नावालाच उभी आहे. बावनदी येथे मोठी वस्ती आहे. तेथून अनेक विद्यार्थी, शाळा महाविद्यालयांमध्ये, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार वर्ग प्रवास करीत आहेत. मात्र या प्रवाशांना निवऱ्यासाठी उभारण्यात आलेली शेडचा फक्त सांगाडाच शिल्लक राहिलेला आहे. परंतु अनेक वर्षे संबंधीत विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आलेले असून सर्व प्रवाशी वर्ग, विद्यार्थी, तसेच आजारी व्यक्तीला भर पावसात, उन्हात ताटकळत उभे राहावे लागत आहे. तरीही स्थानिक पुढारी, नेते, संबंधीत विभाग सुस्त आहेत.

याबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी आल्या असून या शेड वर मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करण्यात आला आहे, अशी चर्चाही सुरू आहे. तरीही याबाबत संबंधीत विभागाने त्वरीत लक्ष देऊन नवीन शेडचे बांधकाम करावे अशी स्थानिक नागरिकांची व महाराष्ट्र समविचारी मंच रत्नागिरीच्यावतीने मागणी केली आहे. त्याच प्रमाणे संबंधीत विभागाकडून सनदशील मार्गाने संपूर्ण माहिती व खर्चाचा तपशील मागविण्यात येणार असल्याचे मंचचे संगमेश्वर तालुका अध्यक्ष मनोहर गुरव यांनी सांगितले.