काळवीट शिकार प्रकरणी सलमानला कोर्टाचा दम: उपस्थित राहा अन्यथा जामीन रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला काळवीट शिकार प्रकरणाच्या खटल्याच्या सुनावणीस गैरहजर राहिल्याबद्दल जोधपूरच्या न्यायालयाने तीक्र नापसंती व्यक्त केली. पुढील सुनावणीस उपस्थित राहा, अन्यथा जामीन रद्द करण्यात येईल, असा इशारा न्यायालयाने सलमान खान याला दिला.

सलमान खान याला 1998 मध्ये दोन काळविटांची शिकार केल्याप्रकरणी 5 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा एप्रिल 2018 मध्ये ठोठावली आहे. त्याविरोधात सलमान याने अपील केले असून, त्याची सुनावणी येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुरू आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 27 सप्टेंबर रोजी होणार आहे.

सलमान खान याला यापूर्वी ट्रायल कोर्टाने सुनावणीदरम्यान गैरहजर राहण्यास परवानगी दिली होती. मात्र, आता न्यायाधीश चंद्रकुमार सोनगरा यांनी सलमान याला उपस्थित राहण्यास बजावले आहे. काळवीट शिकार प्रकरणात ट्रायल कोर्टाने अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे आणि स्थानिक रहिवासी दुष्यंत सिंग यांना संशयाचा फायदा देत मुक्तता केली आहे.