श्रीराम आमच्यासाठी पैगंबर- मौलाना सलमान नदवी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लखनौ

अयोध्या प्रकरणी चर्चेने तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थांची त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. या नेमणुकीवर सध्या सर्वत्र संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, दारुल उलूम नदवतुल उलेमा विद्यापीठाचे प्राध्यापक आणि ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष मौलाना सलमान नदवी यांनी या मध्यस्थीचं समर्थन केलं आहे. प्रभु श्रीराम हे आमच्यासाठीही पैगंबर आहेत, असं नदवी यांनी म्हटलं आहे.

जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, मौलाना नदवी यांनी प्रभु श्रीरामांना समाज सुधारक म्हटलं आहे. मुसलमान या जगात 1 लाख 24 पैगंबर आहेत असं मानतात. प्रभु श्रीरामही त्यांच्यावेळचे पैगंबर होते, असंही नदवी म्हणाले आहेत. जेव्हा एखादा खटला कोर्टात चालतो, तेव्हा कुणीतरी जिंकतो आणि कुणीतरी हरतो. यानंतर विजयी गटाला वरचढ वाटत राहतं तर पराभूत गटाला नाचक्की झाल्याची भावना येते. त्यामुळे अयोध्या प्रश्नावर चर्चेने आणि सामोपचाराने तोडगा काढणंच सर्वथा योग्य असल्याचं मत नदवी यांनी व्यक्त केलं आहे.

बाबरीच्या वादग्रस्त वास्तुला मुस्लीम समाज मशीद असं संबोधतो. त्याविषयी बोलताना नदवी म्हणाले की, शरियत कायद्यानुसार मशीद दुसरीकडे स्थलांतरित करता येते. याचं उदाहरण देताना नदवी यांनी एक उदाहरणही दिलं. खलिफा हजरत उमर यांनी कूफा शहरात एका मशिदीचं स्थलांतर करून त्याजागी खजुराचा बाजार वसवला होता. प्रभु श्रीरामांच्या कार्याकडे पाहून आम्हाला ते पैगंबरांसमान वाटतात. त्यामुळे त्यांच्यासाठी मशिदीचं स्थलांतर करण्यासाठी तडजोड करावी, असं मत नदवी यांनी व्यक्त केलं आहे. या वक्तव्यांनंतर नदवी यांना ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या अध्यक्षपदावरून पदच्युत करण्यात आलं आहे.