
कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अडचणीत सापडलेले माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी ईडीच्या नव्या कारस्थानाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मुंबई झोनल युनिटमध्ये दाखल केलेला ईसीआयआर दिल्लीत वर्ग करण्याचे ईडीचे कारस्थान असून ते रोखा, अशी विनंती त्यांनी केली आहे. या प्रकरणी मंगळवारी तातडीने सुनावणी होणार आहे.
वानखेडे यांनी शाहरुख खानकडून 25 कोटींची लाच मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणात त्यांच्याविरुद्ध सीबीआयपाठोपाठ ईडीने आर्थिक अफरातफरीचा गुन्हा नोंदवला आहे. त्याविरोधात त्यांनी अॅड. करण जैन यांच्यामार्फत रिट याचिका दाखल केली आहे. त्यावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. याचदरम्यान त्यांनी सोमवारी अंतरिम अर्ज दाखल केला. ईडीकडून नाहक त्रास दिला जात आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबईत नोंदवलेला ईसीआयआर दिल्ली झोनल युनिटकडे वर्ग करण्याचे ईडीचे कारस्थान आहे. याबाबत टेलिग्रामवरून धमकीचा मेसेजही आला आहे. हे कारस्थान रोखण्याबाबत न्यायालयाने ईडीला निर्देश द्यावेत, अशी विनंती वानखेडे यांनी केली आहे. त्यांच्या या अंतरिम अर्जावर मंगळवारी न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे.





























































