संगमनेरच्या प्रांताधिकाऱ्यांच्या बंगल्याचा परिसर झाला चकाचक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगरपालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या बंगल्याशेजारी कचराकुंडी तयार झाल्याचे वृत्त दैनिक ‘सामना’मधून आज प्रसिद्ध होताच मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी त्वरित अधिकाऱयांना आदेश देत बंगल्याजवळचा कचरा उचलून घेत साफसफाई केली आहे.

संगमनेर शहरात आणि उपनगरात घंटागाडय़ा फिरत असूनही बऱयाच ठिकाणी नागरिकांनी फेकलेल्या कचऱयाच्या कुंडय़ा तयार झाल्या आहेत. याची साफसफाई मात्र होताना दिसत नाही. घंटागाडय़ा कचरा गोळा करतात, पण साफसफाई करणाऱया आणि घंटागाडीबरोबर फिरणारे कर्मचारी या कचऱयाची विल्हेवाट लावली जात नसल्याचे उघड झाले होते.

स्वच्छ संगमनेर, सुंदर संगमनेर, हरित संगमनेर नुसत्याच बाता… ‘प्रशासकांच्या बंगल्याबाहेरच कचराकुंडी’ अशा मथळ्याचे वृत्त दैनिक ‘सामना’मध्ये आज प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर दोन तासांतच मुख्याधिकाऱयांनी या वृत्ताची गंभीर दखल घेत प्रांताधिकाऱयांच्या बंगल्याशेजारील कचरा उचलून घेत साफसफाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱयांनी त्या ठिकाणी जाऊन कचरा उचलून घेत साफसफाई केली

संपूर्ण शहरासह उपनगरांमध्ये कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडय़ा फिरत आहेत. दिवाळीच्या दरम्यान कचरा पडण्याचे प्रमाण जास्त असते. नागरिकांनीदेखील घंटागाडय़ांमध्येच कचरा टाकावा. शहरातील मोकळ्या जागी कचरा न टाकता नगरपालिकेला संपर्क केला तरी नगरपालिका तो कचरा गोळा करून नेईल. शहर स्वच्छ करण्यासाठी नागरिकांनीदेखील पुढाकार घ्यावा.

– राहुल वाघ, मुख्याधिकारी, नगरपरिषद, संगमनेर.