मराठी माणूस मिंधा करण्याचा डाव उधळला जाईल, संजय राऊत यांचा इशारा

मुलुंडमधील शिवसदन सोसायटीमध्ये मराठी माणसाला घर किंवा गाळा दिला जात नसल्याचा संतापजनक प्रकार बुधवारी समोर आला. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून मराठी माणसाला मिंधा करण्याचा हा डाव उधळला जाईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंधे सरकारला दिला आहे.

संजय राऊत यांनी गुरुवारी सकाळी ट्विट करत मुलुंडमध्ये घडलेल्या घटनेवरून संताप व्यक्त केला. “हा एवढा माज कोठून आला? मुलुंडमध्ये मराठी माणसाला जागा नाकारण्यापुरता हा विषय नाही. आणखी बरेच काही आहे. हा माज कोठून आला? याचे उत्तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मिंधे महामंडळाने द्यायला हवे. भाजपने शिवसेना फोडली ती या मंडळींचा माज वाढवण्यासाठी. मराठी माणूस मिंधा करण्याचा हा डाव उधळला जाईल. जे म्हणतात आमचीच शिवसेना खरी ते उघडे पडले. तृप्ती देवरुखकर यांचे अश्रू वाया जाणार नाही. जय महाराष्ट्र!”, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

गुन्हा दाखल

दरम्यान, तृप्ती देवरुखकर यांच्या फिर्यादीवरून गुजराती पिता-पुत्राविरोधात मुलुंड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे. प्रवीण ठक्कर आणि निलेश ठक्कर अशी दोघांची नावे आहेत.

नक्की प्रकरण काय?

मुलुंडमधील शिवसदन सोसायटीतील गुजराती लोकांनी त्या सोसायटीत मराठी माणसाला घर किंवा गाळा दिला जात नसल्याचे मुजोरपणे सांगत दादागिरी केली आहे. तृप्ती सागर देवरुखकर ही महिला तिच्या पतीसह या सोसायटीत गाळा बघायला गेली होती. त्यावेळी तिचा तेथील सदस्यांशी वाद झाला. त्या वादानंतर त्यांनी त्या महिलेचा फोन हिसकावून घेतला आणि तिच्या नवऱ्याला धक्काबुक्की केली. तृप्ती यांनी या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत त्यांच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आहे.

व्हिडीओ शेअर करत तृप्ती म्हणाल्या, मुलुंड पश्चिमेला शिवसदन सोसायटीत ऑफिससाठी जागा बघायला गेलो. तिथल्या सेव्रेटरीने सांगितले की, मराठी माणसांना त्या सोसायटीत जागा देत नाहीत. आम्ही कारण विचारले त्यावर ते हमरीतुमरीवर आले, दादागिरी करू लागले. नियमावली मागितली तर उलट धमकी दिली. पोलिसांना सांगा नाहीतर आणखी कुणाला सांगा असे सांगत आपला हात पकडला, पतीला धक्काबुक्की केली. शूट करायला गेले तर फोन काढून घेतला. यांना एवढा माज आलाय की, महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला सांगतात की, तुम्हाला सोसायटीमध्ये परवानगी नाही. मग आम्ही गुजरातमध्ये जाऊन राहायचे का? हे आताच थांबले नाही तर पुढे मराठी माणूस नावालाही मुंबईत शिल्लक राहणार नाही, अशा शब्दांत तृप्ती यांनी संताप व्यक्त केला. तसेच आज मला अनुभव आला तो प्रातिनिधिक आहे. अशा कितीतरी मराठी माणसांना हा अनुभव आला असेल आणि किती जणांना घरे नाकारली असतील? असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला आहे.