कमळाबाईच्या गुलामांना, कमळ चिन्हावर निवडणूक लढवायची आहे; संजय राऊत यांचे टीकास्त्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आम्हीच खरी शिवसेना आहोत असं सांगणाऱ्यांना आता बाळासाहेब ठाकरेंच्या धनुष्यबाणापेक्षा कमळ अधिक प्रभावी वाटू लागलं आहे, यातच या मिंध्यांचे ढोंग उघडे पडले असल्याची टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी म्हटले की, ‘शिवसेनेकडून धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव काढून घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कारस्थान केले. मिंध्यांच्या विधानांमुळे हे कारस्थान उघडे पडले. हे सगळेजण कमळाबाईचे गुलाम असून ते कमळ चिन्हावरच निवडणुका लढवणार हे नक्की आहे.’

राऊत यांनी म्हटले की, ” त्यांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह जरी दिले असले, तरी मिंध्यांच्या कोणत्याही उमेदवाराला आपले डिपॉझिट वाचवता येणार नाही. ही भीती वाटू लागल्याने मिंध्यांना कमळ चिन्हावर निवडणूक लढायची आहे. “

आमदार अपात्र प्रकरणी सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान मिंधे गटाच्या एका आमदाराने, शिवाजी महाराज सुरतेला गेले होते म्हणून मीही सुरतेला गेलो होतो असे विधान केले होते. याबाबत प्रश्न विचारला असता राऊत यांनी म्हटले की, ‘हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. ब्रिटीशांच्या ईस्ट इंडिया कंपनीला मदत करणाऱ्या गुजराती मंडळाच्या वखारी लुटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सुरतेला गेले होते. तुम्ही महाराष्ट्र लुटायला तिथे गेलात. शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घ्या.’ गद्दारांनी स्वत:ची तुलना शिवाजी महाराजांशी करू नये कारण गद्दारी आणि बंड यात खूप मोठा फरक आहे, असे राऊत यांनी म्हटले.

पक्षातून पळून गेल्यानंतर आपला पाठलाग केला जात होता असा आरोप मिंधे गटाच्या दीपक केसरकर यांनी केला होता. यावर बोलताना राऊत म्हणाले की, अश्या उंदरांचा कोणी पाठलाग करत का? उंदराच्या मागे मांजर लागली की ती उंदराला खाऊन टाकते. हे सगळे आमच्याकडे आलेले पळपुटे उंदीर होते. कधी बिळात लपले, कधी कोपऱ्यात लपले, पळून गेले यांना कोण विचारतय? केसरकर यांनी सावंतवाडीतून निवडणूक लढवून दाखवावी नाही त्याचे डिपॉझिट जप्त झाले तर पाहा असे राऊत यांनी म्हटले.