
कास पठारावरील अनधिकृत बांधकामांबाबत ऍड. असीम सरोदे यांनी सातारा जिल्हाधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यात विविध मुद्दे उपस्थित केले असून, या मुद्द्यांचा विचार करून त्याबाबत ताबडतोब कारवाई करण्याची विनंती केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून कास पठारावरील अनधिकृत बांधकामाबाबत चर्चा सुरू आहे; परंतु ठोस अशी कारवाई होत नव्हती. आपण याप्रश्नी आवाज उठवल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेने माहिती घेण्यास सुरुवात केली. मात्र, राजकीय दबावामुळे ठोस अशी कारवाई होत नसल्याने आता कायेदशीर मार्गाने हा लढा सुरू केला आहे. याबाबत कागदपत्रे आणि माहिती गोळा करून ऍड. असीम सरोदे यांना पाठवली होती. त्याचा अभ्यास करून ऍड. सरोदे यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे, असे मोरे यांनी सांगितले.
या नोटिशीस 15 दिवसांत उत्तर देण्यात यावे, जेणेकरून पुढील कायदेशीर कारवाई टाळता येईल असे म्हटले आहे. आतातरी जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता बेकायदेशीर बाबींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही सुशांत मोरे यांनी यावेळी केली.





























































