
सातारा नगरपालिकेने 2022-23 ते 2025-26 या वर्षांसाठी सुरू केलेल्या चतुर्थ वार्षिक कर आकारणी प्रक्रियेस नगरविकास विभागाने स्थगिती दिली आहे. सातारा नगरपालिकेची निवडणूक होऊन निवडून आलेल्या समितीचे सदस्य सुनावणी घेईपर्यंत ही स्थगिती राहणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.
सातारा नगरपालिकेने शहरासह हद्दवाढ भागात चतुर्थ वार्षिक पाहणी करून कर आकारणी प्रक्रिया सुरू केली आहे. कोणत्याही व्यक्तीस करासंदर्भात अपील करायचे असल्यास प्रथम नगरपालिकेकडे असलेल्या अपील समितीकडे करण्याची तरतूद आहे. त्यामध्ये जिल्हाधिकारी किंवा प्राधिकृत अधिकारी हे पदसिद्ध अध्यक्ष असून, नगरपालिकेचे नगराध्यक्ष हे पदसिद्ध सदस्य तसेच महिला व बाल कल्याण समिती सभापती हे पदसिद्ध सदस्य, विरोधी पक्षनेता हे सदस्य राहतील अशी नगरपालिका, नगरपंचायत अधिनियमात तरतूद आहे. सातारा नगरपालिकेत सध्या प्रशासक असल्याने त्याठिकाणी सदस्यांचे विधिमंडळ नसल्याने अपिल समिती अस्तित्वात नाही. राज्यशासन कोणत्याही वेळी लोकहिताच्या दृष्टीने नगरपालिका क्षेत्रातील सर्व मालमत्तांच्या करपात्र मूल्याचे पुनर्रिक्षण करण्यासाठी नगरपालिकेला निर्देश देऊ शकेल आणि नगरपालिकेवर ते बंधनकारक राहील अशी तरतूद आहे.
या सर्व बाबींचा विचार करून नगर विकास विभागाने सातारा नगरपालिकेकडून सुरू असलेल्या चतुर्थ वार्षिक कर आकारणी प्रक्रियेस नगरपालिकेची निवडणूक होऊन निवडून आलेल्या समितीचे सदस्य सुनावणी घेईपर्यंत स्थगिती दिली आहे. जिल्हाधिकारी, सहायक संचालक नगररचना तसेच मुख्याधिकाऱयांना याबाबत पत्र पाठवण्यात आले आहे.