
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरणातील पाणी वापराबाबतचे तांत्रिक वर्ष रविवारी (दि. 31 मे) संपले. या तांत्रिक वर्षाच्या अखेरीस कोयना जलाशयात उपयुक्त पाणीसाठा केवळ 11 टीएमसी उरला असून, तो गतवर्षीच्या तुलनेत निम्माच आहे. त्यामुळे वीजनिर्मितीसह सिंचन व पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत चिंतेचे वातावरण आहे. यंदाच्या पर्जन्यमानाविषयी हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजामुळे ही चिंता वाढली आहे.
कोयना धरणातील पाणी वापराबाबतचे तांत्रिक वर्ष 1 जून ते 31 मे याप्रमाणे असते. त्यानुसार आज हे तांत्रिक वर्ष संपले असून, नवीन तांत्रिक वर्ष उद्यापासून (दि. 1 जून) सुरू होत आहे. तब्बल 105.25 टीएमसी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणात आज तांत्रिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी एकूण पाणीसाठा 16 टीएमसी होता. पैकी उपयुक्त पाणीसाठा 11 टीएमसी (15.20 टक्के) इतकाच शिल्लक आहे.
संपूर्ण तांत्रिक वर्षात कोयना धरणातून अखंडितपणे वीजनिर्मिती करण्यात आली. याशिवाय कृष्णा व कोयना नदीवर अवलंबून असलेल्या गावांची तहान भागवून शेतीसाठी पुरेसे पाणी मिळाले. भारनियमनाचेही संकट टळले. कोयना धरणाच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज जलाशयातील सध्याचा पाणीसाठा महाराष्ट्राची चिंता वाढवणारा आहे. पाणीसाठा मोठय़ा प्रमाणात कमी झाल्याने जलाशयाची जागा उघडी पडली असून बाधित गावांचे अवशेष दिसू लागले आहेत. दरम्यान, सोमवार दि. 1 जून 2026 पासून कोयना धरणावर पूर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापन सूत्रांनी दिली.
पावसाळा सुरू झाला की कोयना धरणातील पाणीसाठय़ाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असते. कोयना धरणाच्या पाण्यापासून सुमारे 2 हजार मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. त्यासाठी धरणातील 67.25 टीएमसी पाण्याचा वापर केला जातो, तर सिंचनासाठी 30 टीएमसी पाण्याचा वापर केला जातो. कृष्णा पाणी वाटप लवादानुसार 1 जून ते 31 मे या कालावधीसाठी हा तांत्रिक पाणी करार केला जातो. एक जूनपासून सुरू झालेले पाणी वाटप कराराचे तांत्रिक वर्ष दि. 31 मे रोजी संपुष्टात आले असले तरी कोयना धरणात सध्या 16 पैकी 5 टीएमसी मृत पाणीसाठा वगळता 11 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. चालू वर्षी उन्हाळ्यातील सिंचन व विजेची गरज भागूनही वीज भारनियमनाचे चटके बसले नाहीत.


























































