आपले किल्ले आपली जबाबदारी ; सातारा पोलिसांची मोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची प्रतीके असलेले अनेक गडकिल्ले शासनाचे दुर्लक्ष आणि जनतेची उदासीनता यामुळे उपेक्षित राहिले आहेत. तथापि, सातारा जिह्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलाने पुढाकार घेतला आहे. ‘आपले किल्ले आपली जबाबदारी’ ही टॅगलाइन घेऊन सुरू झालेली ही मोहीम लोकचळवळ होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

महाराष्ट्राच्या अंगाखांद्यावरील शेकडो गडकिल्ले शौर्याची, पराक्रमाची आणि तेजस्वी इतिहासाची साक्ष देतात. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आणि असंख्य मावळ्यांच्या समर्पणाने तीर्थस्थाने झालेले हे गडकिल्ले शासन व जनतेच्या अनास्थेमुळे दुर्लक्षित झाले आहेत. त्या किल्ल्यांचा इतिहास नवीन पिढीला समजावा व स्वच्छतेतून या ऐतिहासिक ठेव्याला नवी झळाळी प्राप्त व्हावी, या उद्देशाने सातारचे जिल्हाप्रमुख समीर शेख यांनी पुढाकार घेऊन गडसंवर्धन व स्वच्छता मोहीम सुरू केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची चौथी राजधानी असलेल्या सातारच्या अजिंक्यतारा किल्ल्यापासून 15 जानेवारीला या गडसंवर्धन व स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. आपले किल्ले ही आपली जबाबदारी असल्याचा संदेश या मोहिमेतून जनमानसात पोहोचविण्यात पोलीस दलाला यश आले आहे. इतिहासप्रेमी व शिवप्रेमी जनतेने या मोहिमेचे स्वागत केले आहे.

गडसंवर्धन व स्वच्छता मोहिमेत येत्या रविवारी कोणता किल्ला असणार याची माहिती जिल्हा पोलीस दलातर्फे व्हॉट्सऍपवरून दिली जाते व इतिहासप्रेमी जनतेला या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले जाते. मोहिमेच्या दिवशी त्या ठिकाणी एकत्र आल्यानंतर गडभ्रमंती केली जाते. ती करता करता प्रत्येकजण कचरा वेचत संपूर्ण किल्ला लख्ख करून टाकतो. त्यानंतर त्या ‘किल्ल्याचा इतिहास व दुर्गसंवर्धनाचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान असा कार्यक्रम असतो. यावेळी सर्वांना अल्पोपहार दिला जातो. यानिमित्ताने मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वांमध्ये इतिहासाविषयी जागृती होते. अज्ञात इतिहास माहिती होतो व याबाबतची बांधिलकी अधोरेखित होते आहे. त्यातूनच या मोहिमेची व्याप्ती हळूहळू वाढत चालली आहे. जिल्हा पोलीस दलाने लोकसहभागातून सुरू केलेली ही मोहीम लोकचळवळ होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

स्वच्छतेमुळे गडकिल्ल्यांनी टाकली कात!

‘अजिंक्यतारा’च्या मोहिमेत त्यांच्यासह 26 अधिकारी, 157 पोलीस अंमलदार व 108 इतिहासप्रेमी नागरिक सहभागी झाले होते. संपूर्ण किल्ल्याचा परिसर पिंजून काढत त्यांनी 210 किलो कचरा गोळा करून कचरा डेपोकडे पाठवून दिला. त्याचप्रमाणे जरंडेश्वरच्या मोहिमेत तेरा पोलीस अधिकारी, 85 पोलीस अंमलदार व 78 इतिहासप्रेमी नागरिकांनी सहभागी होत 144 किलो कचरा गोळा करून कचरा डेपोकडे रवाना केला. या स्वच्छता मोहिमेमुळे अजिंक्यतारा, वसंतगड तसेच जरंडेश्वर कात टाकल्यासारखे दिसत आहेत.

दर रविवारी एक किल्ला

 ‘दर रविवारी एक किल्ला’ असा संकल्प करून सुरू झालेल्या या मोहिमेत 22 जानेवारीला कराड तालुक्यातील किल्ले वसंतगड, 29 जानेवारीला कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर हे स्वतः मोहिमेत सहभागी होत आहेत. त्यांचा प्रत्यक्ष सहभाग या मोहिमेत सहभागी झालेल्या अन्य लोकांसाठी ऊर्जादायी ठरत आहे.