
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
2002च्या गुजरात दंगलीत तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना ‘एसआयटी’ने दिलेल्या क्लीन चिटविरोधात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. याचिकेवर येत्या सोमवारी सुनावणी होणार आहे.
2002 मध्ये गोध्रा कांडानंतर गुजरातमध्ये दंगल उसळली होती. त्यादरम्यान अहमदाबादच्या गुलबर्ग सोसायटीत दंगलीमध्ये काँग्रेसचे खासदार एहसान जाफरी यांच्यासह 69 जणांची हत्या झाली होती. या दंगलीची चौकशी करणाऱया ‘एसआयटी’ने 8 फेब्रुवारी 2012 रोजी क्लोजर रिपोर्ट दाखल केला. त्यात गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह 59 जणांना क्लीन चीट देण्यात आली. ऑक्टोबर 2017 मध्ये गुजरात उच्च न्यायालयाने ‘एसआयटी’ने दिलेली क्लीन चीट कायम ठेवली होती. त्याला काही एनजीओ आणि श्रीमती जाकिया जाफरी यांनी आव्हान दिले होते.
























































