कोप्रोली प्राथमिक शाळेच्या इमारतीची पडझड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, न्हावाशेवा

उरण तालुक्यातील कोप्रोली गावातील प्राथमिक शाळेच्या इमारतीची पडझड झाली असल्याने या शाळेच्या आवारात खेळणाऱ्या गावातील मूल्यांच्या, विद्यार्थ्यांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे.तरी मोडकळीस आलेली शाळेची इमारत पाडण्यात यावी अशी मागणी या गावातील रहिवासी करीत आहेत.

रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभाग,उरण पंचायत समिती आणि स्थानिक ग्रामपंचायत यांनी आपल्या अखत्यारीत असलेल्या प्राथमिक शाळेच्या इमारतीकडे दुर्लक्ष केल्याने आज अनेक गावांतील प्राथमिक शाळांच्या इमारतींची दुरावस्था झाली आहे.त्यात या शाळांच्या इमारती वरील कौलांची, पत्र्याच्या शेडची पावसाळ्यापूर्वी डागडुजी करण्यात येत नसल्याने सर्रास शाळाच्या छतामधून पावसाचे पाणी विद्यार्थ्यांच्या अंगावर ठिबकत असल्याचे चित्र दरवर्षी पावसाळ्यात पाहावयास मिळत आहे. त्यात सध्या कोप्रोली गावातील प्राथमिक शाळेच्या इमारतीची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याचे चित्र दिसत आहे. या शाळेत वर्ग भरत नसले तरी अशा मोडकळीस आलेल्या शाळेच्या इमारतीच्या आवारात गावातील मुले, विद्यार्थी खेळत, बागडत असल्याने एकादी दुर्घटना घडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

शाळेच्या इमारती संदर्भात कोप्रोली गावच्या सरपंच सौ.अलका सतिश म्हात्रे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की सदरच्या शाळेच्या इमारतीला आज 45 वर्ष झाली असून या शाळेच्या इमारतीचा वापर विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी केला जात नाही. तरी गावातील मुलांच्या, विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका पोहचवणारी शाळेची इमारत धोकादायक ठरवून पाडण्यात यावी अशा प्रकारचा ठराव कोप्रोली ग्रामपंचायतीने केला आहे.