
काही शाळांची शैक्षणिक वर्ष 2022-23 ची संचमान्यता अद्यापही शिक्षण संचालनालयाकडे सादर झालेली नाही. शाळांकडून संचमान्यता पूर्ण करण्यास टाळाटाळ होत असून याची गंभीर दखल शिक्षण संचालनालयाने घेतली आहे. अशा शाळांना संचमान्यता पूर्ण करण्यासाठी 12 मेपर्यंतची डेडलाईन देण्यात आली आहे. या मुदतीपर्यंत संचमान्यता प्रलंबित राहणार नाही या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना सर्व शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालकांना देण्यात आल्या आहेत.
शाळांच्या अपूर्ण राहिलेल्या संचमान्यता पूर्ण करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आल्या होत्या. याशिवाय विभागनिहाय संचमान्यता ऑनलाईन शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात स्टुडंट पेंडिंग, वर्किंग पोस्ट पेंडिंग अॅट स्कूल लेव्हल, अॅड पोस्ट इज पेंडिंग, चेंज मीडियम, चेंज कॅटगरी, चेंज मॅनेजमेंट, जनरेट एसएम फॉर डायरेक्टर लॉगीन यासह इतर तांत्रिक अडचणी सोडविण्याचे काम पूर्ण करण्यात आले. तरीदेखील काही विभागातील संचमान्यता अद्यापही प्रलंबित राहिल्या आहेत.
संचमान्यता पूर्ण झाल्याशिवाय कार्यमुक्त नाही
12 मे नंतर कोणत्याही कारणांमुळे संचमान्यता अपूर्ण राहिल्यास संबंधित शिक्षणाधिकाऱयांनी किंवा उपसंचालकांनी 13 मेपासून शिक्षण आयुक्त कार्यालयात उपस्थित राहून अपूर्ण राहिलेली संचमान्यता जनरेट करावी. संपूर्ण जिल्ह्याची संचमान्यता जनरेट होईपर्यंत कोणत्याही अधिकाऱयाला कार्यमुक्त केले जाणार नाही. तसेच ज्या संचमान्यता जनरेट होणार नाही त्याची सर्व जबाबदारी शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालकांची असेल, असे आदेश माध्यमिक शिक्षण सहसंचालक हारून अतार यांनी जारी केले आहेत.
विद्यार्थ्यांची आधार नोंदणी पूर्ण नसल्याचा फटका
संचमान्यतेसाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची आधार नोंदणी ‘सरल पोर्टल’वर करण्याच्या सूचना दिल्या आहेत, मात्र अद्याप आधारनोंदणीच पूर्ण न झाल्याने त्याचा फटका संचमान्यतेला बसला असून शाळांची संचमान्यताही पूर्ण झालेली नाही. मुंबई विभागात केवळ 53 टक्के शाळांची आधार नोंदणी पूर्ण झाली आहे. विभागात 6 लाख 82 हजार विद्यार्थी असून यांपैकी 3 लाख विद्यार्थ्यांची आधारनोंदणी झाली आहे. तर 1 लाख 27 हजार विद्यार्थ्यांची आधारवरील माहिती अवैध आहे. त्यामुळे शाळांच्या संचमान्यतेमध्ये अडचणी येत आहेत.


























































