आली लहर, केला कहर! थेट पाण्याच्या टाकीला दिला ‘स्कॉर्पियो’चा आकार, आनंद महिंद्रा यांनीही केला ‘सलाम’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील अनेक भागात विविध आकाराच्या पाण्याच्या टाक्या आपल्याला दिसतात. पण बिहारमधील भागलपूर येथील इंतसार आलम नावाच्या एका शौकिनाने थेट गाडीच्या आकाराची पाण्याची टाकी घराच्या छतावर बसवली आहे.

स्कॉर्पियो गाडीच्या आकाराची ही टाकी असून याला नंबर प्लेट देखील आहे. ही गाडी एवढी हुबेहूब आहे की नवखा व्यक्ती या भागात आल्यास त्याला घरावर गाडी पार्क केली की काय असाही भास यामुळे होतो. त्यामुळे याचे फोटो देखील व्हायरल होत आहेत. स्कॉर्पियो गाडी बनवणाऱ्या महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा देखील हा फोटो शेअर करण्यावाचून स्वतःला रोखू शकले नाहीत.

आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर याचा फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. आता यालाच एक राईज स्टोरी म्हणतो. स्कॉर्पिओ रायजिंग टू द रूफटॉप. त्यांच्या पहिल्या कार प्रेमाला सलाम, असे ट्विट आनंद महिंद्रा यांनी केले आहे. महिंद्रा यांच्या ट्विटला अनेकांनी रिप्लाय दिला असून यात त्यांनी बनवलेल्या विविध गाड्यांच्या आकारातील टाकीचे फोटो शेअर केले आहेत.

पहिले प्रेम

बिहारमधील भागलपूर भागात राहणारे इंतसार आलम यांनी आपल्या पहिल्या गाडीच्या प्रेमाखातर घराच्या छतावर स्कॉर्पिओ गाडीच्या आकाराची टाकी बनवली. त्यांच्या एसयूव्ही गाडीचा जो नंबर आहे त्याच नंबरची नंबरप्लेट या टाकीच्या आकारातील गाडीला लावण्यात आली आहे. याचे फोटो व्हायरल झाल्यावर थेट आनंद महिंद्रा यांनीही त्यांना सलाम केला.