
सामना प्रतिनिधी । नांदेड
युवतींनो कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हा, वेगवेगळे प्रशिक्षण दिर्घकाळ घेण्यापेक्षा युक्तीने आलेल्या संकटाचा सामना करा, न भिता येणाऱ्या संकटाशी दोन हात करुन समोरच्याला नामोहरम करा, असा संदेश गुरूवारी शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवतींच्या सेल्फ डिफेन्स शिबिरात दिला. युवासेनेचे जिल्हा युवाधिकारी माधव पावडे व महेश खेडकर यांच्या पुढाकारातून गुरूवारी पीपल्स कॉलेजच्या मैदानावर सेल्फ डिफेन्स शिबीर आयोजित करण्यात आले होते. आज दिवसभर चाललेल्या प्रशिक्षणात जवळपास दिड हजारहून अधिक युवतींनी लाभ घेतला.
शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, अभिनेता अक्षय कुमार आणि मेहूल वोरा या तिघांनी मिळून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात युवतींना स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सेल्फ डिफेन्स कॅम्पची निर्मिती केली आहे. महाराष्ट्रभरात मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, रत्नागिरी, खेड, कोल्हापूर, मालेगाव, खांमगाव, वाशिम आदी ठिकाणी आजपर्यंत एकूण शंभरपेक्षा अधिक शिबिरे झाली आहेत. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या तीन दिवसांच्या मराठवाड्याच्या दौऱ्यात हे शिबीर व्हावे, अशी अपेक्षा युवासेनेने व्यक्त केली होती. त्यानुसार आज सकाळी दहा वाजल्यापासून नांदेडच्या युवतींसाठी सेल्फ डिफेन्स शिबीर सुरु झाले. या शिबिरात मुंबईचे जस्मीत मकवाना, विपूल सुरु, राजेश सोनले, संजय कोल्हे यांनी आज युवतींना प्रशिक्षण दिले.
कठीण प्रसंगी, अपहरण प्रसंगी व अन्याय,अत्याचार प्रसंगी युवतींनी कसा प्रतिकार करावा याचे प्रात्यक्षिक देखील या मंडळींने दिले. यानंतर शिवसेना नेते तथा युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवतींना वेगवेगळे प्रश्न विचारुन स्वसंरक्षणासाठी सिध्द व्हा, असे आवाहन केले. समोर येणाऱ्या संकटाला तोंड देण्यासाठी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करा, अन्याय,अत्याचार होत असताना घाबरु नका, डोके चालवा, तुमच्या जोरात ओरडण्याने आजूबाजूची मंडळी जागी होईल तोपर्यंत समोरच्याला प्रतिकार करण्यासाठी काय काय उपाय आहेत याचे यात प्रशिक्षण आम्ही तुम्हाला दिले आहे. घरातून बाहेर पडताना या सर्व बाबी लक्षात ठेवून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सिध्द व्हा, असे आवाहनही त्यांनी केले. वेगवेगळ्या खेळांचे दिर्घकालीन प्रशिक्षण घेण्यापेक्षा संकटाला तोंड देणाऱ्या या काही टिप्स तुम्ही वापरल्या तर निश्चितच समोरची मंडळी घाबरुन जाईल. तेंव्हा तरुणींनो स्वसंरक्षणासाठी सिध्द व्हा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी युवतींना त्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारुन येणाऱ्या समस्या संदर्भात माहिती जाणून घेतली.
अपहरण, अन्याय, अत्याचार, पळवून नेणे या सर्व प्रसंगात न घाबरता सेल्फ डिफेन्सच्या या छोटीखानी प्रशिक्षणातील युक्तीचा वापर करा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी माधव पावडे आणि महेश खेडकर यांनी प्रास्ताविक करुन या कार्यक्रमाची भूमिका समजावून सांगितली.




























































