मोफत साड्या, चप्पल वाटपाची बतावणी करून वृद्धेला लुटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई 

पुढे गरीबांना मोफत साड्या आणि चप्पल वाटप सुरू आहे. तुम्हाला आम्ही घेऊन जातो अशी बतावणी करीत दोघा तरुणांनी एका 74 वर्षीय वृद्धेला लुटल्याची घटना आग्रीपाडा येथे घडली. त्या भामट्यांनी वृद्धेची सोन्याची चैन आणि मोबाईल घेऊन पळ काढला.

सुनंदा चांदोकर या वृद्धा झुला मैदान परिसरात भाजी आणण्यासाठी गेल्या होत्या. त्या फळे घेत असताना अंदाजे वीस वर्षांचे दोन तरुण त्यांच्याजवळ आले आणि पुढे गरीबांना मोफत साडय़ा आणि चप्पल वाटप सुरू आहे. चला आम्ही तुम्हाला घेऊन जातो असे सांगून त्या तरुणांनी सुनंदा यांना जास्त वर्दळ नसलेल्या ठिकाणी नेले. तुमच्या गळ्यातील माळेला काहीतरी लागले आहे असे सांगून त्यांनी सुनंदा यांना सोन्याची माळ काढण्यास भाग पाडले. त्यानंतर शिताफीने दोन तोळ्याची सोन्याची माळ व मोबाईल घेऊन सुनंदा यांना काही कळायच्या आत ते भामटे पसार झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून आग्रीपाडा पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.