शिवडीतील दवाखान्यांचे ‘आरोग्य’ सुधारा, आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवडी विभागातील सर्व दवाखान्यांची झाडाझडती घेऊन आवश्यक ठिकाणी पुरेशा आरोग्य सुविधा पुरवण्याचे निर्देश या वेळी प्रशासनाला देण्यात आले. या वेळी एफ दक्षिण विभागाच्या आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली खाडे यांना निवेदन देण्यात आले.

शिकडी कॉटनग्रीन प्रभाग क्रमांक 206 विभागात रामटेकडी दवाखाना, आचार्य दोंदे मार्ग दवाखाना, वामनराक महाडिक पॉलीक्लिनिक, शिवडी कोळीवाडा दवाखाना व अभ्युदय नगर दवाखाना असे पाच दवाखाने येतात. या दवाखान्यांची पाहणी माजी नगरसेवक सचिन पडवळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. राम टेकडी येथील दवाखान्यांमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टरना एफ साऊथ विभाग व रामटेकडी दवाखाना अशी दुहेरी जबाबदारी असल्यामुळे ती दुहेरी न ठेवता कायमस्वरूपी रामटेकडी दवाखान्यातच रुजू करण्याची मागणी करण्यात आली. सदर दवाखान्यात ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या काही प्रक्रियांसाठी लागणारे इंटरनेट सेवा बिल वेळेत न भरल्यामुळे सुरळीत नाही. शिवडी कोळीवाडा येथील दवाखान्यात सद्य स्थितीत नर्स उपलब्ध आहेत. परंतु ड्रेसर तसेच लहान मुलांना देण्यात येणाऱ्या वॅक्सीन व रेबीझ इंजेक्शन ठेवण्यासाठी लागणारा डीप फ्रीजर उपलब्ध नसल्याचे या वेळी निदर्शनास आले. या पाहणीत  विभागातील सर्व दवाखान्यांमध्ये रुग्णांशी चर्चा केली असता सदर दवाखान्यातून चाचणीसाठी पाठविण्यात येणाऱ्या रक्त चाचण्यांचे रिपोर्ट हे उशिराने मिळतात, बरेचसे रिपोर्ट हे सदोष असल्याचे आढळले. या पार्श्वभूमीवर सर्व दवाखान्यांमध्ये पुरेशा आरोग्य सुविधा द्याव्यात, रुग्णांना व कर्मचाऱ्यांना पिण्यासाठी पाणी शुद्धीकरणाची मशीन व कुलर बसवावेत, अशी मागणी या वेळी करण्यात आली. या सुविधा उपलब्ध करून लेखी स्वरूपात कळवावे, अशा मागणीचे निवेदन एफ दक्षिण विभागाच्या आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली खाडे यांना देण्यात आले. या वेळी शाखाप्रमुख हनुमंत हिंदोळे, डॉ. अनिकेत कोळेकर, डॉ. उमेश बडगुजर, डॉ. श्वेता अकुलवार आदी उपस्थित होते.