
सामना प्रतिनिधी । मुंबई
तू मला खूप आवडतेस, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे अशा आणाभाका घेत 16 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती करणाऱ्या भामटय़ाला खार पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी विवाहित असून तरीही त्याने मुलीचे लैंगिक शोषण केले.
नदीम मन्सरी (29) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो राहतो त्याच परिसरात पीडित मुलगी स्टेफी (नाव बदललेले, 16) ही राहते. विवाहित असतानाही नदीम स्टेफीच्या मागे लागला होता. तो तिला कुठेही गाठून माझं तुझ्यावर प्रेम आहे, मी पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेऊन तुझ्याशी लग्न करीन असे वारंवार तिला बोलायचा. त्यानंतर त्याने स्टेफीला विश्वासात घेऊन तिला घरी नेले आणि तिच्यावर दोन वेळा बलात्कार केला. दरम्यान, अचानक पोटात दुखू लागल्यामुळे स्टेफीच्या पालकांनी तिला रुग्णालयात नेले असता ती 15 आठवडय़ांची गर्भवती असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे पालकांनी विचारपूस केल्यावर नदीमने दोन वेळा बलात्कार केल्याचे स्टेफीने सांगितले. त्यामुळे त्यांनी खार पोलिसांत जाऊन नदीमविरोधात तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तत्काळ शोधाशोध करून भामटय़ा नदीमला अटक केली.



























































