तेजतर्रार!

488

>> विद्या कुलकर्णी

शाहीन ससाणा हे पक्षी हिंदुस्थानात दुर्मिळ असून ते स्थलांतर करून येतात. हे पक्षी हिवाळय़ामध्ये स्थलांतरादरम्यान आर्क्टिकपासून दक्षिण अमेरिकेपर्यंत व परत असा 15.500 मैलांचा प्रवास करतात.

गुजरात मधील 4945 किलोमीटर्स क्षेत्रफळ असलेले कच्छचे रण स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांचे मोठय़ा प्रमाणावर निवासस्थान आहे, तसेच पक्षीप्रेमींचेही ते आवडते ठिकाण आहे. जानेवारी महिन्यात कडाक्याच्या थंडीमध्ये, आमचा पक्षीप्रेमींचा ग्रुप LRK जवळ असलेल्या झैनाबाद येथे उतरला होता. दुपारच्या सुमारास सफारी घेऊन रणमध्ये गेलो होतो. शाहीन ससाणा आल्याची खबर आधीच मिळाली होती, तास दोन तास फिरून सुद्धा दर्शन होत नव्हते. आमच्या गाईडला ही काही समजेना, रणमध्ये आपण दिशाहीन होण्याची नेहमीच दाट शक्यता असते. संध्याकाळच्या सुमारास मात्र प्रतीक्षा संपली व या अजब पक्ष्याने दर्शन दिले. साधारण 10 किलोमीटरच्या परिघात हा पक्षी फिरत होता व त्याच्या नकळत जवळ जाऊन वेगवेगळ्या कोनांमधून आम्ही त्याचे फोटो काढत होतो. सावज पकडण्यासाठी त्याने घेतलेली झेप व पंखांचा पिसारा पाहून मात्र डोळ्याचे पारणे फिटले!!! त्या परिसरात 2-3 तास कसे गेले कळलेच नाही.

शाहीन ससाणा हे पक्षी हिंदुस्थानात दुर्मिळ असून ते स्थलांतर करून येतात. हे पक्षी हिवाळ्यामध्ये स्थलांतरा दरम्यान आर्क्टिक पासून दक्षिण अमेरिकेपर्यंत व परत असा 15,500 मैलांचा प्रवास केल्याचा उल्लेख आहे. जगात साधारण सर्वत्र आढळणारा शाहीन ससाणा त्याच्या वेगवान उड्डाणासाठी व हवाई कसरतींसाठी प्रसिद्ध आहे. सर्व पक्षीगणांत सावज पकडताना ताशी 320 किलोमीटर्स वेगाने झेप घेऊ शकणारा शाहीन ससाणा हा एकमेव पक्षी आहे.

शाहीन ससाणा हे शिकारी पक्षी फाल्कोनिडी कुटुंबाचे असून त्यांची लांबी 34 ते 58 सें.मी. असते. पाठ व पंख निळसर काळे – राखाडी असून त्यावर गडद रंगाची नक्षी असते. पंखांची टोकं काळी असतात. पंखांच्या पिसाऱयातील आतील बाजूस व पोटाच्या खालील भागावर पांढऱया काळ्या रंगाचे पट्टेरी नक्षीकाम असते. त्यांची लांबट शेपटी पाठीच्या रंगाचीच असून टोकं गोल व पांढरी असतात. डोकं, मिश्या व गाल काळ्या रंगाचे असतात. गळा व मानेच्या दोन्ही बाजू पांढऱया रंगाच्या असतात. चोच व खालील फुगीर भाग, पाय पिवळ्या रंगाचे असून नखे काळी असतात. शिशु पक्ष्याचा रंग तपकिरी असून डोळ्याखालील व बाकीचा भाग फिक्क्या निळ्या रंगाचा असतो. या पक्ष्याच्या क्षमता खरेच अचंबित करणाऱया आहेत!! त्यांना एक अतिरिक्त पापणी असून वेगाने झेप घेताना ती डोळ्याच्या संरक्षणासाठी एका टोकापासून दुसऱया टोकापर्यंत झडपेप्रमाणे फिरून डोळा झाकते व ती अर्धपारदर्शक असल्यामुळे त्यांना दिसूही शकते. डोळ्यावरील फुगीर भागामुळे सूर्यप्रकाशातही डोळे सुरक्षित राहतात. डोक्याच्या कवटीतील एका अधिक हाडामुळे वेगवान हालचालींमध्ये सुद्धा डोळ्यांना कुठल्याही प्रकारची इजा होत नाही. शास्त्रज्ञांच्या मतानुसार ह्या पक्ष्यांची दृष्टी माणसांपेक्षा आठपट सरस असते. दोन मैलाच्या अंतरावरून अतिशय छोटे भक्ष्य ते बघू शकतात व अचूक पकडू शकतात.

ह्या पक्ष्यांचे वास्तव्य उंच पर्वतमय भागात व पर्जन्यवनात असून ते थंड प्रदेश, वाळवंट समुद्रसपाटीवर, पर्वतरांगांमध्ये, शहरांमध्ये सुद्धा राहू शकतात. ह्या पक्ष्यांचे खाद्य छोटे – मध्यम आकाराचे पक्षी, छोटे सरपटणारे प्राणी, कीटक इत्यादी असते. हे पक्षी उडत असतानाच हवेमध्ये झेप घेऊन किंवा पाठलाग करून त्यांचे आवडते पक्षी मैना, पारवे, होले इत्यादी पकडतात. पायाच्या नख्या व चोचीच्या टोकाला असलेला धारदार दात वापरून भक्ष्याची मान तोडतात.

या पक्ष्यांचा प्रजनन काळ मार्च ते एप्रिल असून ह्या काळात नर पक्षी मादीला आकर्षित करण्यासाठी खाद्य पुरवतो. मादी नराच्या नख्यातून खाद्य हवेतच पकडते. नर एकाच मादी बरोबर कायम राहतो. हे पक्षी जमिनीतील नैसर्गिक खळग्यामध्येच अंडी घालतात. वेगळे घरटे बांधत नाहीत. मादी पांढऱया किंवा फिक्कट पिवळ्या रंगाची व त्यावर तपकिरी ठिपके असलेली 2-4 अंडी देते. नर मादी मिळून एक महिना अंडी उबवतात. पिल्ले घरटय़ात सहा आठवडे राहून स्वतंत्र होतात. नर मादी दोघेही मिळून पिल्लांना खाद्याचे बारीक तुकडे करून भरवतात. हे पक्षी 1-3 वर्षांचे झाले की पुनरुत्पादन करू शकतात.
LRK मधून अनेक पक्ष्यांची फोटोग्राफी करून आम्ही मुंबईस परत आलो. माझ्या मनात मात्र ‘शाहीन ससाणा’ पक्ष्याची कोरलेली प्रतिमा कायम घर करून राहिली.

आपली प्रतिक्रिया द्या