मोदी आणि पुतीन यांच्यात फरक नाही, देश हुकूमशाहीकडे चाललाय – शरद पवार

राजकीय हितासाठी ‘ईडी’ आणि ‘सीबीआय’ या शासकीय संस्थांचा वापर केला जात असून, निवडणुकांच्या तोंडावर दिल्ली अन् झारखंड येथील मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकण्यात आले. देशाच्या इतिहासात असं कधी घडलेलं नव्हतं. भारत हा लोकशाहीप्रधान देश असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त करुन देश हुकूमशाहीकडे घेऊन जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे व्लादिमीर पुतीन यांच्यात फरक नाही, असा घणाघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

शरद पवार यांनी आज भाजपचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या अकलूज येथील घरी भेट दिली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, शेकापचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, फलटणचे रघुनाथ राजे निंबाळकर, माढय़ाचे माजी आमदार धनाजी साठे, करमाळाचे माजी आमदार नारायण पाटील आदी उपस्थित होते. यावेळी शरद पवार प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

विजयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करावा, हा माझा प्रस्ताव त्यांनी मान्य केला असून, विजयसिंह लवकरच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत, असे पवार यांनी सांगितले.

‘त्यांनी’ 545 पारचा नारा द्यायला हवा

लोकसभा निवडणुकीत भाजपने 400 पारचा नारा दिला आहे, त्यावर बोलताना 400 पारऐवजी त्यांनी 545 पारचा नारा द्यायला हवा होता, अशी खोचक टिपण्णी यावेळी शरद पवार यांनी केली.

मिंधे गटाला धक्का
मिंधे गटाचे करमाळाचे माजी आमदार नारायण पाटील हे आज अकलूज येथील शिवरत्नमध्ये झालेल्या बैठकीस उपस्थित होते. त्यांनी मिंधे गटाला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे नारायण पाटील यांनी जाहीर केले. यामुळे करमाळा, माढा आणि अकलूज मतदारसंघांमध्ये मिंधे गटाला मोठा धक्का बसला आहे.

लोक भाजपच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत

भाजपने आज जाहीर केलेल्या जाहीरनाम्यावर टीका करताना शरद पवार म्हणाले, मोदींनी दहा वर्षांत अनेक आश्वासने दिली. मात्र, त्याची पूर्तता किती केली हा संशोधनाचा विषय आहे. लोक त्यांच्या भूलथापांना आता बळी पडणार नाहीत. माझे जुने सहकारी विजयसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून, त्यांचा हा निर्णय राज्याला दिशा देणार असणार आहे. त्यांच्या प्रवेशाने सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात लाभ होईलच; पण संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद उमटतील, असे पवार यांनी सांगितले.