
कांदा निर्यातबंदीसह केंद्र सरकारने राबविलेले शेतकरीविरोधी धोरण हे शेतकऱयांचे जीवन अस्वस्थ व उद्ध्वस्त करणारे आहे. आम्हाला रास्ता रोको करून जनतेला त्रास देण्याची हौस नाही, पण हे केल्याशिवाय दिल्लीला कळत नाही. शेतकऱयांच्या एकजुटीच्या ताकदीने केंद्र सरकारची झोप उडाली असेल, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर केला.
केंद्र सरकारने लादलेल्या कांदा निर्यातबंदीमुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. संतापाची लाट उसळली असून, ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. शेतकऱयांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सोमवारी रस्त्यावर उतरले. चांदवड येथे मुंबई-आग्रा महामार्गावर त्यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीने रास्ता रोको आंदोलन केले. त्यावेळी ते बोलत होते. घाम गाळून काळय़ा आईशी इमान राखण्याची भूमिका घेणाऱया नाशिक जिह्यातील शेतकऱयांची देशाच्या नकाशावर नोंद घेतली जाते. कांदा या जिरायती पिकापासूनच त्यांना दोन पैसे मिळतात. ज्यांच्या हातात या देशाचे धोरण ठरविण्याचा अधिकार आहे, त्यांची तुमच्या कष्टाला किंमत देण्याची भावना नाही. त्यांनाच जाणीव नसेल तर शेतकरी उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही, अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारचा समाचार घेतला.
…पण आम्ही निर्यातबंदी केली नाही
आपल्या भाषणात शरद पवार यांनी जुनी आठवण सांगितली. संसदेत अध्यक्षांनी मला याबाबत विचारले, भाव वाढल्याने कांदा खाणे मुश्कील झाल्याचे भाजपचे म्हणणे आहे, काय करता येईल? यावर ‘दररोजच्या जेवणात कांद्याचा खर्च किती आहे’, असा सवाल मी केला. ज्यांना मुश्कील झाले असेल त्यांना कांदा खाच असं कोण म्हणतंय. कांदा या जिरायती पिकापासून शेतकऱयाला दोन पैसे मिळतात, त्यामुळे भाव वाढल्याने कोणी दंगा करण्याचे कारण नाही. कांद्याचे भाव कमी होणार नाहीत, निर्यातबंदी होणार नाही, हा निर्णय तेव्हा आम्ही घेतला होता, असे त्यांनी स्पष्ट केले.



























































