महाराष्ट्रात पाच टप्प्यांत निवडणुका का? शरद पवारांनी उघड केला मोदींचा डाव

ज्या राज्यांत चाळीसहून अधिक लोकसभेच्या जागा होत्या, त्या राज्यांत एक किंवा दोन दिवसांत निवडणुका झाल्या. पण महाराष्ट्राची निवडणूक पाच दिवसांत विभागली गेली. यामागचा मोदी आणि भाजपचा डाव राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उघड केला. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ खडकवासला येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.

या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या मतदारांचे आभार मानताना शरद पवार म्हणाले की, आज लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने इतक्या संख्येने तुम्ही उपस्थित असलेल्या तुमचं स्वागत करायला मला मनापासून आनंद होत आहे. देशाचं सूत्र देशाचा कारभार कुणाच्या हातात द्यायचा आणि गेली पाच दहा वर्षं ज्यांच्या हातात तुम्ही सत्ता दिली, त्यांच्या कामाचा आढावा घ्यायच्या दृष्टीने ही निवडणूकआधीची सभा अत्यंत महत्त्वाची आहे. काल देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रात होते, आजही होते. चांगली गोष्ट आहे की त्यांना महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा यावं लागतंय. स्थिती कशामुळे झाली? तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल की निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम आखलाय, तो गमतीचा आहे. तामिळनाडूमध्ये 42 जागा आहेत. त्या जागांची निवडणूक एका दिवसात झाली. उत्तरप्रदेशमध्ये त्याहीपेक्षा जास्त जागा आहेत. त्यांची निवडणूक दोन दिवसांमध्ये. महाराष्ट्रात 48 जागा आहेत, त्याची निवडणूक पाच दिवसांमध्ये होणार आहे. कशासाठी? जर कर्नाटकची किंवा तामिळनाडूची निवडणूक एका दिवसात होऊ शकते, तर महाराष्ट्राची का होऊ शकत नाही? ती होऊ शकत नाही, त्याचं महत्त्वाचं कारण मोदींच्या यंत्रणेचा अहवाल आला असावा की त्यांना यश मिळायची शक्यता नाही. पण, पर्याय काय? त्यांनी मग हा पर्याय शोधला की महाराष्ट्राची निवडणूक चार-पाच टप्प्यात घ्यायची. पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी जायचं. खोट्या गोष्टी लोकांसमोर मांडायच्या आणि लोकांची फसवणूक करून मत मिळवायचं हे सूत्र त्याच्या मागे असलं तर आश्चर्य वाटायचं कारण नाही, असं म्हणत शरद पवार यांनी मोदी आणि भाजपचा डाव उघड केला.

‘मोदी आले, त्याच्याही आधी 2014साली पहिल्यांदा आले. त्यावेळी त्यांनी सांगितलं काय? ते सांगत होते सगळ्या सभांमधून की मनमोहन सिंगांच्या राज्यात महागाई प्रचंड वाढली. ही वस्तु खरी नव्हती. साधी गोष्ट आहे, इंधनाचा दर, पेट्रोलचा दर 2014ला 71 रुपये लीटर होता. मोदींनी सांगितलं 2014ला की माझ्या हातात सत्ता आल्यानंतर 50 दिवसांत पेट्रोलचा दर खाली आणतो. 50 दिवस काय तर आज 3650 दिवस झाले मोदींनी हे आश्वासन देऊन आणि 3650 नंतर त्या पेट्रोलची किंमत काय झाली..106 रुपये लीटर. जे आश्वासन दिलं होतं, 50 टक्क्यांनी खाली आणतो आणि आज 106… तुम्हा आम्हा घरांमध्ये आई-बहीण-पत्नी स्वयंपाक करायला सिलिंडर वापरते. मोदी साहेबांनी सांगितलं की घरगुती गॅस आम्ही 410 होता, आणखीन खाली आणणार. लोकांना खरं वाटलं. तोच सिलिंडर गॅस आज अकराशे साठ रुपये झाला. त्यांनी हे सांगितलं होतं की मत द्यायला जात असाल तर सिलिंडरला नमस्कार करा आणि त्याला नमस्कार करून मत द्यायला जा. तुमची खात्री बसली की भविष्यात असंच होणार आहे. याचा अर्थ एकच आहे, चुकीच्या, खोट्या गोष्टी सांगायच्या. खोटी आश्वासनं द्यायची. या देशातील तरुणांमध्ये अस्वस्थता आहे. नोकरीच्या संधींचा शोध घेतात. मोदींनी सांगितलं की आमची सत्ता आली की एका वर्षांत दोन कोटी तरुणांना नोकरी देऊ. दहा वर्षं होऊन गेली, आज काय चित्र दिसतंय? जगात इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन नावाची संघटना आहे. ती जगातल्या नोकरींच्या संधी संदर्भात अभ्यास करते. त्यांचा अहवाल नुकताच आलाय. त्यात म्हटलंय की भारतात 100 तरूण शिकून बाहेर पडले, तर त्यातल्या 87 तरुणांना नोकरी मिळत नाही. याचा अर्थ काय? दरवर्षी दोन कोटी तरुणांना नोकऱ्या देणारे मोदी आज शंभरातल्या 87 तरुणांना नोकरी देऊ शकत नाहीत. या तरुणांची फसगत करण्याची भूमिका त्यांनी घेतली. या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर त्यांच्या हातात सत्ता देणं देशाच्या हिताचं नाही, या निष्कर्षाशी आपण पोहोचतो.’

‘सत्ता ही देशाच्या हितासाठी, भल्यासाठी, भवितव्यासाठी असते. आज मोदी या सत्तेचा वापर कसा करतात. याची उदाहरणं आहेत. एक उदाहरण देतो. झारखंड नावाचं आदिवासी लोकांचं राज्य आहे, आदिवासी मुख्यमंत्री आहे, रांची ही राजधानी आहे. या मागच्या वर्षी आदिवासी आपल्या राज्यात आदिवासींचं जीवन कसं सुधारता येईल यासाठी जिवनाची पराकाष्ठा करतात. केंद्र सरकारच्या मदतीची अपेक्षा करताहेत. केंद्र सरकारने त्यांचे जास्त प्रश्न सोडवले नाहीत. त्यामुळे एका कार्यक्रमात झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रावर टीका केली. परिणाम काय झाला, राज्याच्या मुख्यमंत्र्याला तुरुगांत टाकलं. देशाची राजधानी दिल्ली. या दिल्लीत दोन तीन निवडुणका अरविंद केजरीवाल निवडून येत आहेत. दिल्लीमध्ये संसदेत सदस्य म्हणून जातो, तेव्हा बघतो की आज दिल्लीचा चेहरा बदलतोय. केजरीवालांनी उत्तम काम केलं. शैक्षणिक संस्थेत आणि प्राथमिक शिक्षणात अनेक सुधारणा केल्या आणि शिक्षणाचा दर्जा वाढवला. केजरीवालांनी दिल्लीत आरोग्यासंबंधी अनेक सुविधा दिल्या. त्यामुळे लोकांचं आजारपण, आरोग्याचे प्रश्न कमी झाले. म्हणून लोकांसाठी काम करणारे केजरीवाल. केंद्र सरकारने एखादं काम नीट केलं नाही म्हणून टीका केली. त्या केजरीवालांना दिल्लीच्या तुरुंगात टाकलं. एक नाही दोन मुख्यमंत्र्याना तुरुंगात टाकायचं. पंजाबच्या मंत्र्यांना अटक करायची. ममता बॅनर्जींच्या मंत्र्यांविरोधात खटले भरायचे. अनिल देशमुख, सामनाचे संपादक, शिवसेनेचे नेते उत्तम लिखाण करतात, लोकांत जागृती करतात. त्यांना तुरुंगात टाकायचं.’

‘स्वातंत्र्यापूर्वी अनेकांनी इंग्रजांच्या तुरुंगात दिवस घालवले. त्यांच्या कष्टांनी देशाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा देश योग्य दिशेने जाईल, याची खबरदारी ते घेतात, त्यासगळ्यांबाबत आजचे राज्यकर्ते कशा पद्धतीने बोलतात. काँग्रेस नेते राहुल गांधींनी संपूर्ण देशाचं चित्र समजण्यासाठी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत रस्त्यावरून चालत जातो. जनतेला भेटतो., तरुणांना, शेतकऱ्यांना, आया-बहिणींना भेटतो. आणि या देशाच्या दुसरं काय ते समजून घेऊन मार्ग काढण्याच दृष्टीने देशात फिरतो, त्या राहुल गांधींना काय म्हटलं जातं. त्यांच्यावर टीका केली जाते. का? पदयात्रा काढणं म्हणजे गुन्हा नाही. ज्या तरुणाचे वडील राजीव गांधी यांनी देशासाठी जीव दिला. त्यांच्या आई इंदिरा गांधी यांनी हौतात्म्य पत्करलं. त्यांचे वडील जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्यपूर्व काळात 13 वर्षं तुरुंगात होते. आणि स्वातंत्र्यानंतर ज्यांनी संसदीय लोकशाही स्थापन आणि आधुनिक विचारांची स्थापना केली. त्यांच्याबद्दल वेडंवाकडं बोलण्याची, नालस्ती करण्याचं काम पंतप्रधानांनी केलं. पंतप्रधान या पदाला महत्त्व आहे. ते महत्त्व राखणं आपलं कर्तव्य आहे. मी कधी वैयक्तिक टीका करत नाही. पण या पदाची गरिमा त्यांनी ठेवलेली नाही. जाईल त्या राज्यात, तिथल्या नेत्यांवर टीका करायची हा कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे. हे बदलायचं असेल तर आपल्याला या देशात बदल करण्याची गरज आहे. आणि ती संधी निवडणुकीच्या मताच्या रुपाने आपल्या सगळ्यांना आलेली आहे.’ असं आवाहन शरद पवार यांनी उपस्थित मतदारांना केलं.