400 पार हा आकडा खूपच कमी! शरद पवार यांचा भाजपला खोचक टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजप देशातील 542 लोकसभा जागांपैकी 400 जागा जिंकणार आणि महाराष्ट्रातील 48 पैकी 40 जागा जिंकणार, असे सांगत आहे. पण भाजपकडून हे आकडे खूपच कमी सांगण्यात येत आहेत. देशातील सर्व जागा जिंकणार, असे भाजपने सांगायला हवे,’ असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला.

शरद पवार यांनी न्यू पॅलेस येथे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘महाविकास आघाडीचे लोकसभेच्या 39 जागांवर एकमत झाले असून दोन ते तीन जागांबाबत चर्चा सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल,’ असे पवार यांनी सांगितले.

…तर आनंदच होईल!
‘फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांशी सहमत असलेले श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे व्यक्तिशः राजकीय पक्षात सहभागी झाल्याचे आपण कधी पाहिले नाही. पण तशी चर्चा असेल आणि कोल्हापूरकरांचीही हीच भावना असेल तर व्यक्तिशः आपल्याला आनंदच होईल,’ असे शरद पवार यांनी सांगितले. ‘श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या उमेदवारीबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार आपल्या एकटय़ाला नाही. जागांबाबत निर्णय आम्ही चर्चा करून घेतो. त्यामुळे याबाबत महाविकास आघाडीच्या घटकपक्षांशी चर्चा करावी लागेल. आपल्या पक्षातील सहकाऱयांशीही चर्चा करावी लागेल,’ असे शरद पवार म्हणाले.