
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अमरावती दौऱ्यावर असून तिथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांचं परखड मत मांडल. पत्रकारांनी राम मंदिराबाबत विचारले असता शरद पवार यांनी राम मंदिरावरून भाजप राजकारण करतेय की व्यवसाय हे माहित नाही, असा टोला भाजपला लगावला आहे.
‘राम मंदिराचे भाजप राजकारण करतायत की व्यवसाय करतय ते माहित नाही. मला राम मंदिराचे निमंत्रण आलेलं नाही. माझी श्रद्धास्थानं आहेत तिथे जातो पण त्याचं जाहीरपणे काही करत नाही. सत्ताधारी पक्षासमोर लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी ठोस असं कारण नाही. त्यामुळे राम मंदिराचा विषय घेऊन जनतेमध्ये वेगळं मत तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे’, अशी टीका शरद पवार यांनी केली.
खासदारांच्या निलंबनाबाबत बोलताना शरद पवार यांनी सत्ताधारी भाजपला फटकारले आहे. ”सभागृहातून 146 जणांन निलंबीत केलं. काय चूक होती त्यांची. दोन जणं संसदेत घुसले त्यांनी धूराच्या नळकांड्या फोडल्या. ते कसे घुसले याची माहिती सरकारने द्यावी हीच त्याची मागणी होती. त्याचा परिणाम 146 लोकांना बाहेर काढलं. सभागृह चालू असताना बाहेरची लोकं घुसतात याची माहिती घ्यायला नको. ही विनंती केल्यानंतर त्यांनी माहिती तर दिली नाही. संसद कशा पद्धतीने सत्ताधारी पक्ष चालवू पाहतेय याचा उत्कृष्ट उदाहरण हे आहे. अर्ध्या तासात तीन बिलं मंजूर केली. त्याच्यावर चर्चाही नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी भाजपला फटकारले.
तीन राज्याच्या निवडणूकीचा निकाल अपेक्षेप्रमाणे नाही याचा अर्थ उद्याच्या निवडणूकीला आम्ही एकत्र काम केलं तर लोक पर्याय म्हणून स्वीकारतील. आम्ही इंडिया म्हणून एकत्र आहोत ते सर्व एकत्र सामोरं जाणं गरजेचं आहे. मल्लिकार्जून खऱगेंना विरोध केल्याच्या बातम्या खोट्या आहेत. मी तिथे उपस्थित होतो कुणीही त्यांच्या नावाला विरोध केलेला नाही. महाराष्ट्रातील निवडणूकांच्या जागावाटपासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ, असे शरद पवार यांनी सांगितले.
बच्चू कडूंकडून चहाचे आमंत्रण
बच्चू कडू शरद पवारांची भेट घेणार असल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्याबाबत शरद पवारांना विचारले असता त्यांनी ही भेट राजकीय नसल्याचे सांगितले. ‘मी अमरावती दौऱ्यावर असल्यामुळे बच्चू कडू यांनी मला त्यांच्याकडे चहासाठी थांबा असं सांगितलं. त्यात काहीही राजकीय नाही’, असे शरद पवार यांनी स्पष्ट केलं.



























































