पवारांनी घेतला वळसे-पाटलांचा समाचार; म्हणाले, ‘कुणाला इतिहास माहिती नसेल तर…’

राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून अजित पवार गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला. एकीकडे पक्ष फुटल्याचे पाहायला मिळतंय तर दुसरीकडे शरद पवारांपासून सुप्रिया सुळेंपर्यंत राष्ट्रवादीचे नेते पक्षात फूट नसल्याचे म्हणत आहेत. अजित पवार आमचेच नेते असल्याचे आधी सुप्रिया सुळे आणि नंतर शरद पवारांनी म्हटले. यावरून संभ्रम झाल्यानंतर आपण तसे म्हणालोच नसल्याचे पवार म्हणाले. तसेच अजित पवार यांना पुन्हा संधी नाही असे म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली. आता त्यांनी आपला मोर्चा दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे वळवला आहे.

शरद पवार यांचे मानसपुत्र समजले जाणारे आणि सध्या अजित पवार गटासोबत गेलेले दिलीप वळसे-पाटील यांनी शरद पवारांवर भाष्य केले होते. याचा शरद पवारांनी खास शैलीमध्ये समाचार घेतला. आपल्याकडे शरद पवारांसारखे उत्तुंग नेते असताना फक्त 60 ते 70 आमदार निवडून येतात. देशात शरद पवार यांच्या उंचीचा नेता कोणीही नाही. पण महाराष्ट्रातील जनतेने शरद पवार यांना बहुमत दिले नाही. शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आले नाही. अनेक प्रादेशिक पक्ष पुढे जात आहेत. ममता बॅनर्जी, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या, असे विधान वळसे पाटील यांनी केले होते. अर्थात यानंतर त्यांनी याबाबत स्पष्टीकरण देत दिलगिरीही व्यक्त केली होती. दिलीप वळसे-पाटील यांच्या विधानावर शरद पवार यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले की, मी स्वबळावर मुख्यमंत्री झालो. तीनदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो. आधी पुलोद स्थापन करून मुख्यमंत्री झालो. दुसऱ्या वेळेला काँग्रेससह माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या. ती निवडणूक आम्ही जिंकली. बहुमत मिळाले आणि मी मुख्यमंत्री झालो. त्यामुळे यापूर्वीचा राज्याचा इतिहास कुणाला माहिती नसेल तर त्यावर काय भाष्य करायचं? असा खोचक प्रश्नच पवारांनी उपस्थित केला.

‘…म्हणून राष्ट्रवादीला पूर्ण बहुमत मिळालं नाही’, रोहित पवारांचा वळसे-पाटलांवर हल्लाबोल