
निखील मोर । पाचोरा
दरवर्षी कमी कमी होत असलेला पाऊस, बदलणारे निसर्ग चक्र याचा परिणाम सर्वदूर पहावयास मिळत आहे. याची झड जनावरांना जास्त प्रमाणात बसत आहे. यातच ज्यांचा व्यवसायच मेंढपाळीचा आहे अशा धनगर बांधवांना तर मेंढ्यांचे पालन पोषण करणे अवघड झाले आहे. परिणामी त्यांच्या संसारावर देखील याचा परिणाम झाला आहे. मेंढ्यांना चारण्यासाठी चाराच नसल्यामुळे हातात कोकरू आणि पाठीवर लेकरू घेऊन मेंढपाळ बांधवांची मैलो न मैल भटकंती सुरुच आहे.
मेंढपाळ हा मुख्य व्यवसाय असलेल्या धनगर बांधवांची आज जगण्यासाठी चालत असलेली धडपड पाहून मन हेलावून जात आहे. यावर्षी सर्वत्र पावसाने दडी मारल्याने शेतात देखील पिके नसल्यात जमा झाली आहेत. पूर्वी पाऊस जास्त आल्याने किमान 8 ते 9 महिने शेतात कापसारखे पिक तग धरुन ठेवायचे. कापूस संपण्यावर आला की, शेतकरी मेंढपाळांना आपल्या शेतात मेंढरांना बसवायला सांगायचे. मेंढरांच्या मल-मुत्रामुळे शेताला चांगल्या दर्जाचे खत मिळते. यामुळे ज्या शेतात मेंढरं बसवली जायची तो शेतकरी मेंढपाळाला त्याबदल्यात अन्न, धान्य आणि काही रोख रक्कम देखील देत असे. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. शेतकऱ्यांच्या शेतात पिकच शिल्लक नाही. दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे आधीच कर्जाच्या ओझ्यात दबलेल्या शेतकऱ्यांकडे मेंढपाळांना देण्यासाठी पैसा येणार कुठून असा प्रश्न उपस्थित राहत आहे. यामुळे शेतकरी देखील आता मेंढपाळांना पैसे देऊन मेंढरं बसविण्यासाठी तयार नाहीत. अशा परिस्थितीत विना चारा पाण्याचे मेंढरं किती दिवस राहतील म्हणून आता शेतकऱ्यांनाच पैसे देण्याची वेळ मेंढपाळांवर आली आहे. त्यातही चारा तर मिळतो परंतु पाण्याची सोय होत नाही. कोणाच्या विहिरीवर पाणी पाजण्यासाठी मेंढरांना घेऊन गेले तर विहीर मालक हाकलून लावतो. ज्या मेंढरांच्या जिवावर आपला संसार उभा आहे अशा मेंढरांना पाळायचे तरी कसे असे मोठे आव्हान मेंढपाळ बांधवांपुढे उभे आहे.
दुष्काळात तेरावा महिना या म्हणीप्रमाणे रात्र-रात्र जागुन जंगली श्वापदापासून मेंढ्यांचे संरक्षण करावे लागते. तसेच काही टवाळखोर दादागिरी करुन मेंढ्या घेवून जातात. अशा विविध अचणींचा सामना मेंढपाळ बांधवांना करावा लागत आहे. या परिस्थितीत मेंढरांना जगविण्यासाठी गावोगाव भटकंती करावी लागत आहे. यात कुटूंबांची होणारी अवहेलना तर वेगळीच. ’भुमीवर पडावे आकाश पांघरावे’ याप्रमाणे उघड्यावर संसार उभा करावा लागतो. मग मुला बाळांचे शिक्षण होणार तरी कसे यामुळे तेही शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित राहत आहेत. विविध शासकिय योजनांची माहिती देखील नसणारे मेंढपाळ बांधव त्या योजनांपासून देखील लांबच लांब आहेत. अशा मेंढपाळ बांधवांचा वाली कोण असा प्रश्न यानिमीत्ताने उपस्थित राहतो.





























































