शिराळ्यातील पाझर तलावांनी गाठला तळ, माळरानावरील पिके करपण्याच्या मार्गावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिराळा तालुक्यात अनेक तलावांमधील पाणीसाठा झपाटय़ाने कमी होत चालला आहे, तर बहुतांश पाझर तलावांनी तळ गाठला आहे. कडक उन्हाळा सुरू झाला असल्यामुळे विंधन विहिरीसह पाझर तलावातील व धरणातील तसेच विहिरीमधील पाणीसाठा झपाटय़ाने घटत आहे. सध्या परिस्थिती पाहता बळीराजा आतापासूनच चिंताग्रस्त दिसून येत आहे. माळरानावरील पिके पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर असून, शेतीच्या मशागतीची कामे ठप्प आहेत. तालुक्यातील शेतकऱयांना आता वळीवाच्या पावसाची आस लागली आहे.

शिराळा तालुक्यात गुढीपाडवा व गोरक्षनाथ यात्रेदरम्यान वळीवाचा पाऊस पडतो; यंदाचा गुढीपाडवा संपला, गोरक्षनाथ यात्राही संपली. मात्र, अद्यापि वळीवाच्या पावसाने दडी मारल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. शिराळा तालुक्यात अंदाजे 22च्या आसपास पाझर तलाव आहेत. यातील बहुतांश तलावामधील पाणीसाठा 40 ते 50 टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे, तर उर्वरित तलावांमधील पाणीसाठय़ामध्येही दिवसेंदिवस घटच होत आहे. उत्तर भागातील कोंडाईवाडी, शिरशी, भैरवदरा, शिरशी, काळेखिंड अशा अनेक तलावांतील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे.

शिराळा तालुक्यातील प्रमुख रब्बी हंगामातील शाळू, गहू, हरभरा पिकांना बहुतांश ठिकाणी पाण्याची कमतरता भासली नाही. परंतु, मार्चअखेरपासून पाझर तलाव, विहिरींसह कूपनलिकांच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. उशिरा पेरणी

केलेल्या गहू, हरभरा, शाळू पिकांची काढणी मळणीची कामे संपली आहेत. तालुक्यात ऊस पिकांमध्ये ठिबक सिंचन करण्यात शेतकऱयांचा कल वाढू लागला आहे. मोरणा, शिवणीसह अनेक धरणांतील पाणीसाठाही झपाटय़ाने कमी होत आहे.

गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस जास्त पडला. मार्चपर्यंत पाण्याची कमतरता भासली नाही. शिराळा तालुका हा डोंगराळ तालुका असल्याने अगोदरच पाणीसाठा कमी राहतो; परंतु सध्या तर पाण्याचा साठा आतापासूनच झपाटय़ाने कमी होत चालला आहे. अनेक पिके करपू लागली आहेत. त्यामुळे गेल्या मार्च महिन्यापासूनच शेतकरी वर्गाचे डोळे वळीवाच्या पावसाकडे लागून राहिले आहेत. परंतु, शिराळा तालुक्यात अद्याप वळीवाचा एकही पाऊस पडलेला नाही.