
>> शिरीष कणेकर
नाव अंजली माने. (मूळ खऱ्या नावातले एक अक्षरही मी दिलेल्या या नावात येणार नाही याची मी दक्षता घेतलीय.) वय वर्षे पंचाहत्तर. नुकतीच तिची पंचाहत्तरी साजरी झाली. तिनंच केली. दुसरं कोण करणार? नवरा, मुलंबाळं कोणीच नाही. कधीच नव्हते. लेट मी क्लेरिफाय. आपण अविवाहित राहण्यासाठीच जन्माला आलेलो आहोत अशी तिची धारणा आहे.
‘का हो, लग्न का नाही केलंत?’ शेवटी मी एकदा विचारलंच.
‘करायलाच हवं का?’ तिनं प्रतिप्रश्न केला.
‘माझा आग्रह नाही, पण सर्वसाधारणपणे माणसं करतात. ठरावीक वय झालं की मुलंमुली आपसूक लग्नाच्या बंधनात अडकतात. स्वेच्छेनं, राजीखुशीने, अक्कलहुशारीने! त्यांना लग्न का केलंत असं कोणी विचारत नाही. त्यात काय विचारायचं? दात घासले का विचारतो का आपण? पण लग्न न करणं म्हणजे वेगळी वाट चोखाळणे होते. समोरच्या चेहऱयावर आपसूक प्रश्नचिन्ह उमटते. म्हणून विचारले. लग्न न करण्यामागे काही निश्चित भूमिका असते. लग्नाच्या अनेक ‘ऑफर्स’ त्यानं किंवा तिनं जाणीवपूर्वक ठुकरवलेल्या असतात. काही केसेसमध्ये पुढे पश्चात्तापही होतो, पण वेळ निघून गेलेली असते.’
‘माझ्याबाबतीत असे काहीही झालेलं नाही,’ मला अडवून ती ठामपणे म्हणाली. माझ्या मनात आलं की, हिनं लग्न केलं असतं तर हिच्या नवऱ्याचं काही खरं नव्हतं. झाडूपोता करताना दिसला असता. ‘यांना’ झाडून घेता यावं म्हणून तिनं मला पाय वर घ्यायला सांगितले असते.
‘पुरुषावाचून माझं आयुष्यात काहीही अडलेलं नाही.’ तिनं सांगून टाकलं.
यानंतर माझ्यावरच्या सभ्य संस्कारांना शिव्या घालत बसण्याखेरीज माझ्या हातात काहीच नव्हतं. उद्या खानावळीत जेवणारा एखादा पुरुष म्हणायचा- ‘स्त्रीवाचून माझं आयुष्यात काहीही अडलेलं नाही.’ त्याला विचारता येईल की, स्त्री ही केवळ स्वयंपाकीणकाकू असते का? लग्न नसेल करायचं तर नका करू, लग्न न करण्याचं खरं कारण नसेल सांगायचं तर नका देऊ, पण खुदा के लिये काहीतरी बक्वास बोलू नका.
स्त्री-पुरुषात देवानं निर्माण केलेली ओढ तुम्हाला कशी जाणवत नाही? देवाची योजना तुम्ही हाणून पाडायला निघालायत का? आपल्यातल्या नैसर्गिक त्रुटींचं तुम्ही भांडवल करताय का? हा प्रश्न येणार हे जाणून त्याची उत्तरे तुम्ही लोकांनी हुशारीनं तयार करून ठेवलेली असतात. समोरच्याला निरुत्तर केलं की तुमचा कार्यभाग साधलेला असतो. समोरच्याचं तोंड बंद केल्यानं आपला मार्ग सुकर होत नसतो ही साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही. कळत नाही, कारण तुम्हाला मुळात ती कळून घ्यायचीच नसते. आपण केलंय ते बरोबर केलंय असं खोटं तुम्हाला स्वत:लाच सांगायचं असतं. सुखाच्या या खोटय़ा, कृत्रिम व अभासी दुनियेत तुम्हाला राहायचं असतं. उलट आम्ही चुकलो व स्वत:ला दु:खी करून बसलो हे प्रांजलपणे कबूल करण्यात कमीपणा कसला आलाय? स्वत:शी प्रामाणिक राहण्यात सुख व समाधान नाही का? पण मुळात त्यासाठी स्वत:ला ओळखायला नको का? कितीतरी लोकांना आपल्याला काय हवंय तेच कळत नाही. अंजलीबाई त्यांच्यापैकीच नसतील कशावरून?
नवऱ्यानं स्वयंपाकाची स्तुती करणे म्हणजे काय, हे अंजलीबाईंना ठाऊकच नसेल तर त्या सुखाला आपण मुकतोय हे त्यांना कसं कळणार? मुलानं दुखणाऱ्या गुडघ्यांसाठी आठवणींनी तेल आणून देणं म्हणजे काय हे अंजलीबाईंना ठाऊकच नसेल तर त्या सुखाला आपण मुकतोय हे त्यांना कसं कळणार? नातवंडांनी दंगा करून घर डोक्यावर घेणं म्हणजे काय हे अंजलीबाईंना ठाऊकच नसेल तर त्यातल्या परमोच्च आनंदाला आपण कसं मुकतोय हे त्यांना कसं कळणार? नवऱ्याच्या, मुलांच्या, नातवंडांच्या काळजीनं जीव अर्धामुर्धा होणं म्हणजे काय हे त्यांना ठाऊकच नसेल तर त्यातलं मनुष्यजन्माचं सार्थक त्यांना कसं कळणार? आयुष्यात स्वहस्ते ठहेराव (स्टॅग्नेशन) ओढवून घेण्यातली मूढता व चूक कोण व कशी अंजलीबाईंच्या गळी उतरवणार…?
परवा आकस्मात अंजलीबाईंचा फोन आला. नमनाला चमचाभर तेल न दवडता त्यांनी थेट मुद्दय़ालाच हात घातला. त्या निर्विकारपणे म्हणाल्या, ‘मला लग्न करायचंय.’ आँ? मी दिड़मूढ झालो. या वयात लग्न? म्हातारचळ लागलाय का? चाळीस वर्षांपूर्वी हे काही सुचलं नाही? आता हवं तर पन्नाशीचा मुलगा दत्तक घ्या व निवृत्त संसारी असल्याचा उसना आनंद घ्या.
मी त्यांच्यासाठी नवरा मुलगा (आय मीन, म्हातारा!) शोधावा असं त्या सुचवीत होत्या का? की माझंच स्थळ त्यांच्या डोळय़ांपुढे होतं…?





























































