
सामना ऑनलाईन, मुंबई
दर्जेदार सोयीसुविधा, कचरा व्यवस्थापन, वीजनिर्मिती अशा हायटेक व्यवस्था परळच्या डॉ. शिरोडकर मंडईत होणार आहेत. या मंडई व इमारतीच्या पुनर्विकासाच्या कामाचे भूमिपूजन शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते व महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज करण्यात आले. मुंबई महापालिका मुंबईकरांसाठी दर्जेदार रस्ते, चांगल्या आरोग्य सुविधा, मुबलक पाणीपुरवठा करीत असून मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन यावेळी आदित्य ठाकरे यांनी केले.
पालिकेच्या मंडईंपैकी महत्त्वाची मंडई असलेल्या परळच्या डॉ. शिरोडकर मंडईच्या पुनर्विकासात दोन इमारतींपैकी एका इमारतीचा पुनर्विकास अडीच वर्षांत होणार आहे. यामध्ये एक ते तीनपर्यंतचे मजले व्यावसायिक वापरासाठी, 4 ते 7 मजले वाहनतळ आणि 8 ते 21 मजले कर्मचाऱ्यांच्या निवासी वापरासाठी बांधण्यात येणार आहेत. यामध्ये 106 निवासी सदनिका बांधण्यात येणार आहेत. या मंडईचे काम ‘अ’ दर्जाचे कंत्राटदार मेसर्स हिरानी एंटरप्रायजेस करणार आहेत. या कामासाठी 77.96 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. या ठिकाणच्या प्रकल्पग्रस्तांचे लवकरात लवकर पुनर्वसनही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. या इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी उपमहापौर हेमांगी वरळीकर, आमदार अजय चौधरी, सभागृह नेत्या विशाखा राऊत, बेस्ट समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षा डॉ. अर्चना भालेराव, बाजार व उद्यान समिती अध्यक्ष हाजी मोहम्मद हलीम खान, प्रभाग समिती अध्यक्ष सचिन पडवळ, नगरसेविका श्रद्धा जाधव, नगरसेविका स्नेहल आंबेकर, सिंधुताई मसुरकर, नगरसेकक अनिल कोकीळ, दत्ता पोंगडे, उर्मिला पांचाळ, उपायुक्त नरेंद्र बरडे, सहाय्यक आयुक्त (बाजार) डॉ. संगीता हसनाळे तसेच क्यापारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
पालिकेच्या बाजार विभागाच्या वतीने डॉ. शिरोडकर मंडईचा पुनर्विकास करण्यात येत आहे. पुनर्विकासात मासळी-मटण अशा नाशवंत वस्तूंसाठी शीतगृहाची व्यवस्था करण्यात येणार आहे. इमारतीत उत्पन्न होणाऱ्या घनकचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी 0.5 टीपीडी क्षमतेचा बायोगॅस पॉवर जनरेशन प्लाण्ट उपलब्ध असेल. यातून निर्माण होणाऱ्या विजेचा वापर सामायिक विद्युत वापरासाठी करण्यात येईल. इमारतीत सौरऊर्जा निर्मितीही केली जाईल.




























































