शिवसेनेची एसटी व वीज वितरण कार्यालयावर धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
अनियमित सुटणाऱ्या बस सेवेबाबत आगार व्यवस्थापकांना जाब विचारताना शिवसेना शिष्टमंडळ. (अमित खोत, मालवण)

सामना प्रतिनिधी । मालवण

अनियमित सुटणाऱ्या गाड्या व त्याचा प्रवासी वर्गाला होणारा त्रास या प्रश्नी शिवसेना शिष्ठमंडळाने मालवण बस स्थानकात धडक देत आगार व्यवस्थापकांना जाब विचारला. गोर गरीब प्रवासी वर्गासाठी एसटी ही जीवनवाहिनी आहे. याचा विचार करून अधिकारी कर्मचाऱ्यांनी सेवा द्यावी. प्रवासी वर्गाला त्रास होता नये, असा सूचक इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला. यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महावितरणाच्या मालवण कार्यालयावरही धडक देत वीज समस्यांबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

यावेळी जि. प. सदस्य हरी खोबरेकर, शिवसेना तालुकाप्रमुख बबन शिंदे, नगरसेविका सेजल परब, सुनीता जाधव, तृप्ती मयेकर, शहर प्रमुख बाबी जोगी, मनोज खोबरेकर, युवा सेना शहरप्रमुख तपस्वी मयेकर, संमेश परब, किरण वाळके, नंदू गवंडी, किसन मांजरेकर व अन्य उपस्थित होते.

चार दिवसापूर्वी देवबाग मार्गावरील सायंकाळी शेवटची वस्तीची फेरी न सोडल्याबाबतही अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. रात्री उशिरापर्यंत प्रवासी थांबून होते. मात्र बस सुटलीच नाही. याबाबत हरी खोबरेकर व मनोज खोबरेकर यांनी संतप्त भावना मांडल्या.

दरम्यान, प्रभारी आगार व्यवस्थापक सचेतन बोवलेकर यांनी माहिती देताना सांगितले, काही गाड्या अन्य डेपो मधून येतात. काहीवेळा पावसाळी कालावधीत गाड्या वेळेत सुटत नाही. काही फेऱ्या रद्द होतात. त्यात संपर्क यंत्रणा बंद पडली तर दुसऱ्या डेपोतील गाड्यांचा वेळ सांगता येत नाही. देवबाग मार्गावरील गाडीही वेंगुर्ला येथूनच येते. चार दिवसापूर्वी ती पावसामुळे रद्द झाली. प्रवासी वर्गाला चांगली सेवा देणे हे आमचे कर्तव्य आहे. ते प्रत्येक अधिकारी-कर्मचारी पार पाडतो. तरी यापुढे रद्द झालेल्या गाड्या अथवा उशिरा असणाऱ्या गाड्याची माहितीही प्रवासी वर्गाला वेळेत दिली जाईल. असे बोवलेकर यांनी स्पष्ट केले.

महावितरणवरही धडक
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महावितरणाच्या मालवण कार्यालयावरही धडक देत वीज समस्या बाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शहरात बहुतांश भागात स्ट्रीट लाईट बंद आहे. जीर्ण झालेले वीज खांबही काही ठिकाणी धोकादायक असून ते बदलणे गरजेचे आहे. त्या बरोबरच वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर कार्यालयाचा दूरध्वनी बंद होतो अथवा लागत नाही. अश्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. त्या तात्काळ दूर कराव्यात. कमी दाबाचा अथवा उच्च दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे वीज उपकरणांचे नुकसान होण्याचे प्रकार घडतात. त्या बाबतही मदत मिळण्याबाबत कार्यवाही व्हावी अशी मागणी हरी खोबरेकर यांनी यावेळी केली.