शिवसेनेसाठी आणि उद्धव ठाकरेंसाठी 100 दिवसच काय, जन्मठेप भोगायला तयार! – संजय राऊत

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे शेतकऱ्यांच्या अतिप्रचंड, विराट मेळाव्याला संबोधित करताना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंधे सरकार आणि गद्दारांवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेसाठी आणि उद्धव ठाकरेंसाठी 100 दिवसच काय, जन्मठेप भोगायलाही तयार असल्याचे म्हटले.

विराट सभेला संबोधित करताना संजय राऊत यांनी शिवसेनेचे चिन्ह काय आहे? असा सवाल करताच समोर जमलेल्या हजारो शिवसैनिकांनी एका सुरात मशाल उत्तर दिले. उपस्थितांचा उत्साह पाहून संजय राऊत यांनी शिवसेनेला प्रचाराची गरज नसल्याचे म्हणत या पेटलेल्या मशाली गद्दारांचे खोके बेचिराख केल्याशिवाय राहणार नाही असे म्हटले.

ही भूमी राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंची आहे. ज्या राष्ट्रमातेने आम्हाला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज दिले, त्या भूमीत गद्दारीची बिजं रोवली गेली आहेत, ही बिजं कायमची उखडून फेकण्यासाठी मशाली पेटल्या आहेत, असेही संजय राऊत म्हणाले. तसेच एकही खोकेवाला परत निवडून येता कामा नये ही शपथ आपण घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, बुलढाण्यामध्ये किती खोके आले. सर्वात जास्त खोके बुलढाण्यात आले आहेत. एक फुल दोन हाफ, एक खासदार आणि दोन आमदार. आज तिकडे गुवाहाटीतील देवीला नवस फेडायला गेलेत, महाराष्ट्रातील देव संपले का? सगळ्यात मोठी देवता, राष्ट्रमाता जिजाऊंचे मंदिर, रेणुका देवीचे मंदिर बुलढाणा जिल्ह्यात आहे आणि रेडे गेले गुवाहाटीला, असा टोला लगावत राऊत म्हणाले की, हा महाराष्ट्र संतांचा आहे. आमच्याकडे ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवून घेतले आणि मुख्यमंत्री 40 रेड्यांचे बळी द्यायला गुवाहाटीला गेले. काय दुर्दैव आहे या राज्याचे.

अरविंद सावंत यांनी तुरुंगाचा उल्लेख केला. शिवसेनेसाठी आणि उद्धव ठाकरेंसाठी 100 दिवसच काय, जन्मठेप भोगायला तयार आहे. ज्या पक्षाने, मलाच नाही तर देशाला दिले आहे. त्या शिवसेनेसाठी हे हजारो, लाखो शिवसैनिक जिवाची कुर्बानी द्यायला तयार आहे, त्यांच्यासाठी एक संजय राऊत कुर्बान झाला तर काय झालं. आपण महाराष्ट्राला आणि देशाला दाखवून देऊ. आमच्यावर किती अन्याय, अत्याचार करा, पण हे लाखो शिवसैनिक तुम्हाला मोडून काढता येणार नाही, विकत घेता येणार नाहीत, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

आज संविधान दिवस आहे. आजच्या दिवशी भारतीय घटना निर्माण झाली. पण सध्या राज्य बेकायद्याने सुरू आहे. या महाराष्ट्रात संविधान दिवस साजरा करण्याचा अधिकार सरकारला नाही. कारण एक बेकायदेशीर सरकार आपल्या बोडक्यावर बसवले आहे आणि ते लवकरच जाणार, असेही राऊत म्हणाले.

मी जवळपास 110 दिवस तुरुंगात होतो. जाताना माझ्या हातात भगवा होतो. शेवटच्या श्वासापर्यंत भगवा माझ्याबरोबर राहील हे सांगत होतो आणि तो राहणार आहे. लोकसभा निवडणुका असतील किंवा विधानसभा निवडणुका असतील, शिवसेनेचे 25 खासदार आणि किमान 115 आमदार निवडून द्यायला हवेत. शिवसेनेचा स्वबळावर मुख्यमंत्री निवडून या रेड्यांचा राजकीय बळी आपण घेतला पाहिजे तर आपण शिवसैनिक, असे राऊत यांनी म्हणताच उपस्थित शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला.

खोके सरकार महाराष्ट्रासाठी पनवती, शेतकरी व तरुणांच्या प्रश्नांवरून उद्धव ठाकरेंनी मिंधे सरकारवर डागली तोफ

आता शिवसेना आधीच्या पेक्षा जोमाने आणि वेगाने पुढे चालली आहे. या बुलढाणा जिल्ह्यात आलेले सगळे खोके आणि त्यांचे सरकार यांनी फक्त बुलढाणा जिल्ह्याची नाही तर महाराष्ट्राची बदनामी केली आहे. महाराष्ट्राला या बुलढाणा जिल्ह्यामुळे इतिहास आहे. कारण या भूमीमध्ये राष्ट्रमाता जिजामाता जन्माला आल्या आणि त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मोघलांविरुद्ध, परकीय आक्रमकांविरुद्ध आपली तलवार चालवली. या महाराष्ट्राच्या इतिहासाची सुरुवात आणि मशाल या बुलढाणा जिल्ह्यातून पेटली. म्हणून या महाराष्ट्रावर पुन्हा एकदा भगवा फडकवण्याचा निश्चय करणारी सभा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बुलढाण्यात होतेय, असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, जरी 40 रेडे गुवाहाटीला नवस फेडायला गेले असले तरी त्यांचे लक्ष या सभेकडे आहे. त्यांना माहितीय समोर आलेले हजारो, लाखो लोकं नवस करून आणलेले नाहीत. हे आपली पदरमोड करून, भाकरी खावून आलेले आहेत. 200 खोके शेतकऱ्यांना मिळाले असते तर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले असते. 40 रेडे महाराष्ट्रात, बुलढाण्यात परत येतील तेव्हा त्यांना जाब विचारायला हवा.

तुम्ही 40 फोडले असाल पण हे विदर्भातील 40 लाख शिवसेनेसोबत आहात. तुम्ही त्यांच्याशी काय सामना करणार. तुम्ही वतनदार फोडले असाल, पण हा फाटका मावळा शिवसैनिक आहे, ज्याने छत्रपतींचे हिंदवी स्वराज्य निर्माण केले, तोच हा मावळा त्याचा वंश आहे, तो पुन्हा एकदा महाराष्ट्रात शिवसेनेचे राज्य आणेल आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री या महाराष्ट्राच्या सिंहासनावर विराजमान होईल, असेही राऊत म्हणाले