
कल्याण शहराचा समावेश स्मार्ट सिटी योजनेत होऊन दहा वर्षे उलटली तरी नागरिकांना अपेक्षित सुविधा मिळाल्या नाहीत. ४८१ कोटींचा प्रकल्प ६०२ कोटींवर जाऊनही वाहतूककोंडी कायम आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाची पोलखोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते विजय साळवी यांनी केली आहे. प्रकल्पाची कोटींची उड्डाणे होऊनही नागरिक वाहतूककोंडीने – मेटाकुटीला आले आहेत. याप्रकरणी साळवी यांनी पालिका आयुक्त तसेच ठाणे जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देऊन स्मार्ट सिटी प्रकल्पाचा सविस्तर अहवाल जाहीर करण्याची मागणी केली आहे.
२०१६ मध्ये कल्याण शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला. स्मार्ट सिटीमुळे शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा, वाहतूक व्यवस्थेत सुसूत्रता, सुरक्षित व आधुनिक शहराची निर्मिती होईल अशी अपेक्षा होती. मात्र दहा वर्षांनंतरही शहरातील अनेक मूलभूत प्रश्न कायम असल्याचे विजय साळवी यांनी निवेदनात म्हटले आहे. सॅटिस प्रकल्पाचा मूळ खर्च ४८१ कोटी रुपये इतका निश्चित करण्यात आला होता. मात्र आता या प्रकल्पाचा खर्च ६०२ कोटी रुपयांपर्यंत वाढल्याचा दावा साळवी यांनी केला आहे. स्मार्ट सिटीच्या घोषणेला दहा वर्षे झाली. मात्र स्मार्ट सिटीचा नागरिकांना नेमका काय फायदा झाला, असा सवालही साळवी यांनी प्रशासनाला केला आहे.
३१२ उपकरणे बंद
स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात सिग्नल, सीसीटीव्ही, इलेक्ट्रिक अशी तब्बल १०६५ स्मार्ट उपकरणे बसवण्यात आली असून त्यापैकी ३१२ उपकरणे बंद असल्याचा दावा विजय साळवी यांनी केला आहे. नागरिकांच्या सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून उभारण्यात आलेली उपकरणेच बंद असतील तर स्मार्ट सिटी योजनेचा नेमका लाभ नागरिकांना कितपत मिळत आहे, असा सवाल त्यांनी केला आहे.
- २०१६ पासून आजपर्यंत स्मार्ट सिटी योजनेंतर्गत मंजूर, सुरू, पूर्ण तसेच अपूर्ण असलेल्या सर्व प्रकल्पांचा एकत्रित स्थिती अहवाल सार्वजनिक करा.
- प्रत्येक प्रकल्पासाठी मंजूर झालेला निधी, प्रत्यक्ष झालेला खर्च, प्रकल्पाची सद्यस्थिती आणि संबंधित जबाबदार यंत्रणा यांची माहिती नागरिकांसमोर आणा.
- सॅटिस प्रकल्पाच्या खर्चवाढीची नेमकी कारणे कोणती? कामाच्या व्याप्तीत कोणते बदल करण्यात आले? या बदलांना कोणत्या सक्षम प्राधिकरणाची मंजुरी मिळाली का? याची माहिती सार्वजनिक करा.

























































