शिवसेना, ‘सामना’वर पीएचडी करणाऱ्या मान्यवरांचा अपंग सहाय्य सेनेने केला गौरव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून ‘शिवसेना’ आणि दैनिक ‘सामना’ या विषयावर पीएचडी मिळवणाऱया मान्यवरांचा शिवसेना अपंग सहाय्य सेनेच्या वतीने आज गौरव करण्यात आला.

मुंबई मराठी पत्रकार संघात हा कार्यक्रम पार पडला. शिवसेना विषयावर पीएचडी करणारे दिवंगत शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या स्मृतींना यावेळी उजाळा देण्यात आला. अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठातून ‘शिवसेनेचे मानवतावादी कार्य’ या विषयावर पीएचडी करणाऱया शिवसेनेच्या अकोला जिल्हा महिला संघटक डॉ. सौ. सरिता विजय वाकोडे, दैनिक ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रावर पुण्याच्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक विद्यापीठातून पीएचडी करणारे डॉ. सुपृत खांडेकर, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील अग्रणी, थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनकार्यावर पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठातून पीएचडी करणारे डॉ. अनंत गुरव, डॉ. मनीष देशमुख, डॉ. नंदकिशोर जगदाळे, जर्मनीत जाऊन ‘दृष्टीपलीकडचे सौंदर्यशास्त्र’ या विषयावर पीएचडी मिळविणाऱया अंध भगिनी डॉ. पूर्वी जंगम यांना शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते यावेळी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी आदी याप्रसंगी उपस्थित होते. शिवसेना अपंग सहाय्य सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत लाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले. पत्रकार नीलिमा कदम-जांगडा यांनी सूत्रसंचालन, तर विजय तारी यांनी आभारप्रदर्शन केले.