मुंबईत रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार, आदित्य ठाकरे यांनी केली पोलखोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील रस्ते आणि पुलांची कामे खडीअभावी गेल्या दोन आठवडय़ांपासून ठप्प पडली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीय कंपनीला खडी पुरवण्याचे काम देण्यासाठी हे कारस्थान सुरू असल्याचा सनसनाटी आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केला. रस्त्यांच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे सांगत त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. हिंमत असेल तर राज्यातील कोणत्या शहरांमधील कामे सुरू आणि बंद आहेत याची माहिती ‘सीएम’ म्हणजेच ‘करप्ट मॅन’ने श्वेतपत्रिका काढून जनतेला द्यावी अशी मागणीही त्यांनी केली.

‘मातोश्री’ निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारच्या या भ्रष्टाचाराची माध्यमांसमोर पोलखोल केली. ते म्हणाले की, ‘मुंबईतील कामांसाठी एकाच कंपनीकडून खडी खरेदी करण्याचा कंत्राटदारांवर दबाव आणला जात आहे. 300 रुपये टनाने मिळणारी खडी ही कंपनी साडेचारशे ते सहाशे रुपये टनाने विकत आहे. स्वतःचे स्वराज्य असावे असा हा वेगळा टॅक्स लावला आहे का?’ असा सवाल करतानाच, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यात लक्ष घालावे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

महापालिकेने स्पष्टीकरण द्यावे

‘डिलाईल रोड पूल किंवा आणखी काही महत्त्वाच्या प्रकल्पांची महापालिकेने हाती घेतलेली कामे आता 31 मेपूर्वी पूर्ण होणे अशक्य आहे. त्यामुळे नवीन रस्त्यांच्या कामाच्या डेडलाईनबाबत मुंबई महापालिकेने मुंबईकरांना स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे,’ असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

पावसाळय़ापूर्वी कामे कशी पूर्ण करणार?

आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘मिंधे सरकारने मुंबईत 400 किलोमीटर रस्त्यांच्या विकासकामांची घोषणा केली होती. महानगरपालिकेत नगरसेवक नसतानाही पाच कंपन्यांना 650 कोटींची कंत्राटे परस्पर देण्यात आली. जानेवारीत वर्कऑर्डर काढली. मात्र फेब्रुवारी, मार्च जाऊन एप्रिल सुरू झाला तरी कामे सुरू झालेली नाहीत. मग ती पावसाळय़ापूर्वी पूर्ण कशी होणार?’ जिथे भ्रष्टाचार होतोय ती पर्यावरण, एमपीसीबी, नगरविकास ही खाती घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडे आहेत, असाही निशाणा आदित्य ठाकरे यांनी साधला.

कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस

क्वारी आणि क्रशर्सना महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) नोटिसा बजावल्या आहेत. त्याआधी कंत्राटदार कंपन्यांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला कंपनीतील एकही वरिष्ठ अधिकारी नव्हता. कनिष्ठ अधिकाऱयांनी हजेरी लावली. त्यामुळे या कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली; परंतु तरीही त्या कंपन्यांनी कामे सुरू केलेली नाहीत, असे आदित्य ठाकरे यांनी निदर्शनास आणून दिले.

 

विधानसभा अध्यक्षांच्या नगरसेवक भावाचीही तक्रार

आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांचे भाऊ असलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकानेच महापालिका आयुक्तांना पत्र दिले असल्याचे सांगितले. त्यांच्या वॉर्डात रस्त्यांची कामे सुरू झाली नसल्याची तक्रार त्यांनी केली असल्याचे ते म्हणाले. गद्दार गँग सोडली तर भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य पक्षांच्या माजी नगरसेवकांच्या वॉर्डातही कामे सुरू न झाल्याने ते नाराज आहेत, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.