फडणवीस नव्हे फोडणवीस! घरफोडे गृहमंत्री!! उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला

राज्याला एक गृहमंत्री आहे. देवेंद्र फडणवीस नव्हे फोडणवीस…जनतेनेच आता फोडणवीस हे नाव त्यांना ठेवले आहे. हे घरफोडे मंत्री आहेत. हे काय, आणि अमित शहा काय दोघेही दुसऱ्यांची घरे फोडतात. कारण यांच्या घरात काही निर्माणच झाले नाही. ना विचार, ना कोणता आदर्श…असा जोरदार हल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर चढवला.

उद्धव ठाकरे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात दोन दिवसांचा झंझावाती जनसंवाद दौरा केला. कोपरगाव, संगमनेर, अकोले येथे उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी अलोट गर्दी उसळली होती. जनसंवादाला जाहीर सभेचेच स्वरूप आले होते. जागोजागी भगवे तुफान पाहायला मिळाले. मी माझ्या कुटुंबाला भेटत आहे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला.

गद्दारांना गाळमिश्रीत पाणी पाजा
गद्दारी करून मिंधे गटात पळालेल्या खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावरही उद्धव ठाकरे यांनी आसूड ओढले. इथले खासदार हे काही दिवसांतच खासदार झाले. ते फारसे कोणाला माहीतही नव्हते. फक्त ‘शिवसेना’ हे चार अक्षरी नाव त्यांच्या मागे लागल्यामुळे येथील जनतेने त्यांना निवडून दिले. आता ते कसे निवडून येतात तेच बघू. मुळात या गद्दाराला तिकीटच मिळणार नसल्याचे कळते. गद्दारांनी आपला पक्ष पळवला, चिन्ह पळवलं. त्या गटामध्ये इथले खासदार सामील झाले. अशा गद्दाराला धडा शिकवावाच लागेल. गद्दार खासदाराला ज्यांनी निवडून दिले, ती जनता माझ्यासोबत आहे, अशा गद्दारांना येत्या निवडणुकीत येथील गाळमिश्रित पाणी पाजा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

भाजपला एवढे प्रयत्न करूनसुद्धा उद्धव ठाकरेंना संपविता येत नाही. आज समोर बसलेली ही अफाट जनता हेच त्यांच्यासाठी उत्तर आहे. इथे सर्व जाती-धर्मांचे लोक आले असून आम्ही हिंदुत्व सोडले नाही. सगळ्यांना सोबत घेऊन जाणारे आमचे हिंदुत्व असल्याचे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

जात-पात विसरून संविधान वाचविण्यासाठी एकत्र या!

संपूर्ण देशात आता हुकूमशाही विरुद्ध लोकशाही असा लढा होणार आहे. पंतप्रधान घराणेशाहीविरोधात बोलतात. मात्र त्यांना चव्हाण, मिंधे आणि अजित पवार यांची घराणेशाही चालते. पण ज्या शिवसेनाप्रमुखांनी तुमच्या पाठीवर हात ठेवला. त्यांची घराणेशाही तुम्हाला नको आहे? त्यामुळे जनतेने यांच्या भूलथापांना बळी पडू नये. आज देशातील संविधान धोक्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची घटना धोक्यात आली असून याविरोधात सगळ्यांनी लढा द्यायचा आहे. त्यामुळे तुम्ही जात-पात-धर्म विसरून एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

लोकसभा आणि विधानसभेला शिवसेनाच

ही सभेची वेळ नाही. तरीही एवढय़ा मोठय़ा प्रमाणात तुम्ही येथे आला आहात. एवढी मोठी गर्दी बघितल्यावर येथील लोकसभा आणि विधानसभेत शिवसेनेचाच वाघ निवडून जाईल याची खात्री वाटते, असा जबरदस्त विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

दहा वर्षे गवत उपटत होते का?

देश सामर्थ्यवान बनवायचा आहे, असे पंतप्रधान मोदी आता सांगतात. मागच्या दहा वर्षांपासून तुमचीच सत्ता आहे. मग दहा वर्षे गवत उपटत होतात का, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर केला. या सरकारचा विकास पाहायचा असेल तर 2014 ते 24 या दहा वर्षांतील पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव पाहा. प्रत्येक गोष्टीच्या किमतीत प्रचंड वाढ केल्याचा ‘विकास’ दिसून येईल. केंद्र सरकार सरकारी यंत्रणांचा वापर करून एक प्रकारे विरोधकांना धमकावत आहे. तुरुंगात टाकत आहे. पण ज्या वेळी आमचे सरकार येईल. त्या वेळेला आम्ही अशाच चौकशा करू. अधिकाऱयांनादेखील आमचे सांगणे आहे – अन्याय करू नका. दोषी असाल तर तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

मोदींना पण कळलंय, भाजपवाले त्यांचं स्वप्न पूर्ण करू शकणार नाहीत. म्हणून ते उपरे-बाजारबुणगे भाजपात घेतायंत.

सुखामध्ये साथ देतात ते ‘रिश्ते’ असतात, संकटात साथ देणारे ‘फरिश्ते’ असतात. माझी जनता माझ्यासाठी ‘फरिश्ते’ आहे.

‘मोदी गॅरंटी’चा डंका पिटणाऱयांवर ‘उद्धव गॅरंटी’चे लोकार्पण करण्याची वेळ!

कोपरगाव तलावातील पाणी साठय़ासाठी, एमआयडीसीसाठी मी मुख्यमंत्री असताना पैसे दिले. ते काम आता पूर्ण होत आले आहे. काम पूर्ण होऊ द्या, या कामाच्या उद्घाटनासाठीसुद्धा पंतप्रधान येतील. निळवंडे धरणासाठीही आम्ही निधी दिला. त्याचे श्रेयही त्यांनी लाटले. एवढेच काय तर मुंबईत आपण कोस्टल रोड करत असून त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. तरीसुद्धा त्याचे उद्घाटन, लोकार्पण करायला स्वतः पंतप्रधान येताहेत. येऊ द्या, चांगली गोष्ट आहे. पण हे जे काही ‘मोदी गॅरंटी… मोदी गॅरंटी..’चा डंका पिटताहेत त्यांच्यावर आता ‘उद्धव गॅरंटी’चे लोकार्पण करण्याची वेळ येते आहे, हे केवढे मोठे भाग्य आहे. ‘उद्धव ठाकरे जे बोलतो, ते करून दाखवतो,’ याला आता पंतप्रधान साक्षी असतील, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर कडाडून टीका केली.

अन्नदात्याविरोधात जवान उभे केले जाताहेत, ही कसली लोकशाही?

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या सरकारने स्वामिनाथन यांना ‘भारतरत्न’ दिला. स्वामिनाथन यांना भारतरत्न देता, तर मग त्यांच्या शिफारशी लागू का करत नाही? याच मागण्यांसाठी दिल्लीकडे येणाऱया शेतकऱयांना का रोखता? दिल्लीच्या सीमेवर पोलीस, निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहेत, जणू दिल्लीच्या सीमेवर युद्ध सुरू आहे. शेतकऱयांची मुले असलेल्या पोलिसांना, जवानांना त्यांच्याच आई-वडिलांना रोखण्यासाठी सीमेवर उभे करता, ही कुठली लोकशाही आहे, असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. भारतमातेच्या रक्षणासाठी पोलीस दलात किंवा सैन्यात भरती झालेल्यांना अन्नदात्याविरोधात उभे केले जात असल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. शेतकऱयांवर बंदुका रोखणारे नादान सरकार आपल्याला खाली खेचावेच लागेल, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

कोपरगावात ना काळे, ना कोल्हे; आता शिवसेनेचा वाघ!

‘‘कोपरगावकरांनी ज्या पद्धतीने शिवसेनेचे जल्लोषात स्वागत केले ते बघून आता जनता काळे, कोल्हे यांना पंटाळली असून येत्या काळात येथे शिवसेनेचा वाघ निवडून येईल,’’ असा जबरदस्त विश्वास शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

संजय राऊत म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील जनता भ्रष्ट सरकारला पंटाळली असून आता सरकारला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. कोपरगावात आठ दिवसांतून एकदा पाणी येते, तेही अतिशय गढूळ मिळते, ही चिंताजनक बाब आहे. येथील राजकारणी स्वतःला सम्राट म्हणवून घेतात; पण जनतेचे प्रश्न सोडविण्याची त्यांच्यात इच्छा नाही. यापुढे कोपरगावातील जनतेचा प्रश्न सोडविण्यासाठी कोल्हे आणि काळे यांना निवडून देण्यापेक्षा शिवसेनेच्या वाघाला संधी द्या,’’ असे आवाहन संजय राऊत यांनी उपस्थित जनतेला केले.

मोदींसारखा चेहरा असताना इतरांची गरज का?

‘‘अब की बार चारसो पार’ची भाषा करणाऱया नरेंद्र मोदींना आज नांदेडची एक जागा जिंकण्यासाठी अशोक चव्हाणांना पक्षात घ्यावे लागत आहे. मोदींचा चेहरा एवढा प्रखर आणि तेजस्वी आहे ना? नरेंद्र मोदी हे विष्णूचे तेरावे अवतार आहेत ना? प्रभू श्रीराम आहेत ना? तरीही अनेक असे छोटे-मोठे रावण घेऊन 2024च्या निवडणुका जिंकण्याची वेळ का आली आहे?’’ अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली. शिर्डी येथे पत्रकारांशी ते बोलत होते. पंतप्रधान मोदी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी वेळोवेळी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केल्याची आठवणही संजय राऊत यांनी करून दिली.

शेतकऱयांवर बंदुका रोखणारे नादान सरकार खाली खेचा

दिल्लीच्या वेशीवर शेतकऱयांवर डागण्यासाठी पाण्याच्या तोफा तयार ठेवल्यात. सीमेवर घालतात तसे खिळे असलेले तारेचे पुंपण टाकलेय. सैनिक, निमलष्करी दल, पोलीस सगळय़ांना बंदुका घेऊन तयार ठेवलंय. अश्रूधुराचे गोळेसुद्धा पह्डताहेत. मोदीजी, एवढा निर्लज्ज कारभार करू नका. जे शेतकरी आधीच रडताहेत. त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडण्यापेक्षा त्यांच्या डोळय़ांतून अश्रूच्या धारा वाहत आहेत त्या आधी पुसा. का अमित शहा आणि मोदी त्या शेतकऱयांना जाऊन भेटत नाहीत? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स आणि पोलिसांच्या माध्यमातून शिवसैनिकांच्या मागे ससेमिरा लावता. जुन्या केसेस उकरून काढत आहेत. अरे तुम्ही काय सलून काढलंय जुन्या केसेस काढायला. सलूनवाले झालात की काय? आमचं सरकार येऊ द्या आम्ही तुमचं हमाम कसं करतो ते बघाच. तुमच्या सगळय़ा केसेस बाहेर काढणार.

कितीही भ्रष्टाचार करा, भाजपात या, आपको कुछ नहीं होगा, ही मोदी गॅरंटी आहे. यावर एक श्वेतपत्रिका काढायला हवी. गेल्या दहा वर्षांत फोडाफोडी करून भाजप जो काय वाढलाय, कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत, इतर पक्षांतील किती लोक भाजपात घेऊन मानसन्मान दिलाय, हे यामुळे कळेल.

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार शंकरराव गडाख, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, संपर्कप्रमुख, आमदार सुनील शिंदे, उपनेते साजन पाचपुते, उपनेते शुभांगी पाटील, सहसंपर्कप्रमुख अॅड. दिलीप साळगट, राजेंद्र झावरे, प्रवीण शिंदे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी राष्ट्रवादी काँगेस पार्टी शरदचंद्र पवार, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि मुस्लीम समाजबांधवांकडून उद्धव ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले.