मंत्रीपद कसले घेता आधी जनतेच्या प्रश्नांना सामोरे जा, गुलाबराव पाटीलांना शिवराम पाटीलांचे आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांना महाराष्ट्र जागृत जनमंचचे शिवराम पाटील यांनी आव्हान दिले आहे. गुलाबराव पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेण्याआधी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जनतेच्या प्रश्नांना सामोरे जावे व त्यांची उत्तर द्यावीत असे, आव्हान महाराष्ट्र जागृत जनमंचचे शिवराज पाटील यांनी केले आहे. शिवराज पाटील यांची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात त्यांना गुलाबराव पाटील यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.

”जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि माजी पाणीपुरवठामंत्री गुलाबराब पाटील यांना महाविकासआघाडी सरकारमध्ये मंत्रीपद मिळाले. पाणी दार खाते आणि पाच नद्यांच्या रेतीची सुभेदारी मिळाली. तापी, गिरणा, अंजनी, बोरी, पांझराची हालत त्यांनी चंबळसारखी केली. नद्यांचे इतके लचके कधीच कोणी तोडले नाहीत. नळातून पाणी ऐवजी दारू येऊ लागली. विरोधात कोणीच उरले नाही. खडसे गारद, महाजन गायब, देवकर नायब, आयएएस आणि आयपीएस कलेक्टर अन एसपी सुद्धा हतबल ठरले. गुलाबराव पाटील म्हणजे राज्यघटना, गुलाबराव पाटील म्हणजे भारतीय दंड विधान, गुलाबराव पाटील म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहिता. ‘आगे पिछे… हमारी सरकार, हम है यहा के… राजकुमार’, असे त्या पोस्टमध्ये म्हटलेले आहे.

तरच गुलाबरावांना मंत्रीपद द्या

गुलाबराव पाटील यांना मंत्रीपद देऊ नका. आधी त्यांची अग्नि परिक्षा होऊन जाऊ द्या. त्यात ते पवित्र ठरले तरच मंत्री बनवा, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.