
सामना प्रतिनिधी । बीड
शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करा, दुष्काळी उपाययोजना तातडीने राबवा, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करा या मागणीसाठी संतप्त शिवसैनिकांनी सोमवारी अनोखे आंदोलन केले. बीडजवळील कुटेवाडी येथील एका कोरड्या विहिरीत उतरून 50 ते 60 शिवसैनिकांनी आंदोलनाला सुरूवात केली. दुपारपर्यंत हे आंदोलन सुरू होते. शिवसैनिकांच्या या आंदोलनाने प्रशासनाची तारांबळ उडाली.
बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर होऊन आता तब्बल दीड महिना उलटला आहे. मात्र, जिल्ह्यात अद्यापही दुष्काळी उपाययोजना सुरू झालेल्या नाहीत. शेतकऱ्यांची आणि दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्याची दिशाभूल करण्याचे काम सरकारने केल्याची भावना जनतेत निर्माण झाली आहे. त्यामुळे अनोखे आंदोलन करून शिवसैनिकांनी सरकारविरोधातील रोष व्यक्त केला. तालुकाप्रमुख गणेश वरेकर, उपजिल्हाप्रमुख जयसिंग चुंगडे आणि महिला आघाडीच्या जिल्हा संघटक संगिता चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बीड तालुक्यातील कुटेवाडी येथील 60 फूट खोल कोरड्या विहिरीमध्ये उतरून शिवसैनिकांनी आंदोलनाला सुरूवात केली. राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत कर्जमाफी झाली पाहिजे, मागेल त्याला टँकरचे पाणी मिळाले पाहिजे, जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी छावण्या सुरू झाल्या पाहिजेत, मजुरांच्या हाताला काम मिळाले पाहिजे अशा मागण्या शिवसैनिकांनी केल्या. दुपारपर्यंत शिवसेनेचे हे आंदोलन सुरूच होते. आंदोलनाची माहिती मिळताच बीडच्या तहसीलदारांसह महसूल आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहचले. शिवसेनेच्या या अनोख्या आंदोलनाने प्रशासनाची तारांबळ झाली. या आंदोलनात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.





























































