
सामना प्रतिनिधी, नांदेड
तालुक्यातील सुगाव शिवारात एका टेम्पोमधून अवैधरित्या कत्तलीसाठी जाणारा व वीस बैल-गायींचा समावेश असलेला टेम्पो शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांनी पाठलाग करून पकडला. संतप्त जमावाने या टेम्पोवर दगडफेक केली. या प्रकरणात पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून टेम्पोसह तीन आरोपींना अटक केली आहे. सर्व जनावरे देखील ताब्यात घेतली आहेत.
नांदेडपासून जवळच असलेल्या सुगाव शिवारात आज सकाळी सात वाजता एक मोठा टेम्पो जात होता. काही नागरिकांना संशय आल्यानंतर त्यांनी या टेम्पोला थांबविले. मात्र टेम्पो चालक वेगाने आपली गाडी पळविण्याच्या बेतात होता. संतप्त जमावाने या टेम्पोवर दगडफेक केली. परभणी जिल्ह्यातून ही जनावरे कत्तलीसाठी नांदेडात येत असल्याची माहिती गोवंश प्रेमींना मिळाली होती त्यांनी पाठलाग करून सदरचा टेम्पो अडविला.
यावेळी संतप्त जमावाने सदरच्या टेम्पोवर दगडफेक करून गाडीच्या काचा फोडल्या. या टेम्पोत 20 बैल व गायी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. लिंबगाव पोलिसांनी तत्काळ या प्रकरणात हस्तक्षेप करत पुढील अनर्थ टाळला. याकामी शिवसेनेचे तालुका संघटक नवनाथ काकडे, तालुकाप्रमुख जयवंत कदम, उपतालुकाप्रमुख संतोष भारसावडे, भाजपाचे दत्ता भोसले, माधव शिंदे, बबनराव वाघमारे, बालाजी वाघमारे आणि नागरिक यांनी पुढाकार घेतला होता.





























































