कांजूरमार्गमध्ये रंगणार शिवसेनेचा मराठी दांडिया, मराठी सिनेतारकांची खास उपस्थिती

नवरात्रोत्सवात मुंबईत ठिकठिकाणी गरबा आणि दांडियाची धूम पाहायला मिळते. यंदाच्या नवरात्रीत सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे तो म्हणजे कांजूरमार्ग येथील भव्यदिव्य मराठी दांडिया. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विक्रोळी विधानसभेच्या वतीने 15 ते 23 ऑक्टोबर या कालावधीत कांजूरमार्ग पूर्व येथील परिवार गार्डन येथे मराठी दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष आकर्षण म्हणजे या नऊ दिवसांत विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. आघाडीच्या मराठी सिनेतारकांच्या उपस्थितीत हा दांडिया रंगणार आहे.

विक्रोळी विधानसभेचे आमदार सुनील राऊत यांच्या वतीने मराठी दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘आपला बाणा, आपला उत्सव, आपली संस्कृती जपूया… नवरात्रीच्या नवरंगात मराठमोळा दांडिया खेळूया…’ अशी या उत्सवाची टॅगलाईन आहे. मराठी दांडियासाठी कांजूरमार्ग पूर्व येथील परिवार गार्डनमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. भव्य आणि आकर्षक स्टेज उभारण्यात आला आहे. मैदान रोषणाईने उजळून निघाले आहे. सर्वत्र भगवेमय वातावरण पसरले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ‘मशाल’ या चिन्हाची प्रतिकृती लक्षवेधी ठरत आहे. विशेष म्हणजे, या मराठमोळय़ा दांडियामध्ये सर्वांना विनामूल्य प्रवेश असणार आहे.

शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी या ठिकाणी भेट देऊन उत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. हा केवळ ईशान्य मुंबई नव्हे तर संपूर्ण मुंबईतील भव्यदिव्य असा मराठी दांडिया आहे. दांडिया म्हणजे काही लोकांसाठी धंदा बनला आहे. दांडियाच्या नावाखाली हजारो रुपये उकळले जातात. त्याला आळा घालण्यासाठीच शिवसेनेने या ठिकाणी मराठी दांडिया आयोजित केला आहे. जबरदस्त असा दांडिया या ठिकाणी होणार आहे, असे खासदार संजय राऊत म्हणाले.